गुटखा किंग पाचोर्याचे त्रिमूर्ती, वितरण मात्र पिंपळगाव हरेश्वर येथील एका टेलरच्या व किराणा दुकानातून.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०८/२०२२
सद्यस्थितीत महाराष्ट्रात एका बाजूला पोलीस यंत्रणेने गुटखा बंदी करण्यासाठी कंबर कसली असून बऱ्याचशा ठिकाणी वाहने पकडून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केले आहे. परंतु दुसरीकडे मात्र गुटख्याचा गोरखधंदा करणारांनी नामी शक्कल लढवून काही ठिकाणी ‘राजाश्रय घेत’ मोठमोठ्या शहरांमध्ये व गावागावांतील दुकानात, पानटपरीवर एजंटामार्फत काही ठिकाणी चोरट्या मार्गाने तर काही ठिकाणी दिवसाढवळ्या घरपोच करुन मोठमोठ्या शहरांसह, खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांवर विक्री करण्यासाठी पाठवण्यात येत असल्याने आजही शहरांसह खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरु आहे. या गुटखा तस्करी व विक्रीमुळे आजही हजारो तरुण या व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं जीवन उध्वस्त करून घेत आहेत.
असाच काहीसा प्रकार पाचोरा शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात काही ठिकाणी चोरी, चोरी, चुपके, चुपके तर काही ठिकाणी दिवसाढवळ्या भररस्त्यावर कायद्याच्या रक्षकांच्या समोर शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याचा गोरखधंदा सुरु असून पाचोरा शहरातील तीन गुटखा किंग पाचोरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यात तसेच पाचोरा शहरातील काही ठिकाणी गुटखा साठवणूक करुन नंतर आपल्या सवडीनुसार व पोलीसांना चकणा देत तर काही वेळा समोर वाहतूक करुन खेड्यापाड्यात, वाडा, वस्तीवर किराणा दुकानदार, पानटपरीवर पुरवठा करतात व या कारणास्तव हा गुटख्याचा व्यवसाय गल्लीबोळातून सुरु आहे.
अवैधरित्या गुटखा विक्रीच्या व्यवसायाबद्दल सत्यजित न्यूजकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार पाचोरा शहरातील तीन मुख्य गुटखा किंग असून हे पिंपळगाव हरेश्वर येथील एक टेलर व्यवसायीक, एक किराणा दुकानदार, कुऱ्हाड येथील दोन, लोहारा येथील तीन, वरसाडे येथील एक यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गुटखा पाठवतात व नंतर हे एजंट आसपासच्या बऱ्याचशा गावातील दुकानातून व पानटपरीवर गुटखा पाठवून विक्री करुन यातून दरमहा लाखो रुपये कमाई करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे या गुटखा विक्रेत्यांनी आपली दुकाने भररस्त्यावर उघडली असून दिखाव्यासाठी इतर व्यवसायाची दुकाने असल्याचा देखावा करत याच दुकानातून शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याचा गोरखधंदा करत आहेत. ही दुकाने भररस्त्यावर, बसस्थानक, शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, हॉटेल, वाड्यावस्त्यांची वहिवाट पाहून रहदारीच्या रस्त्यावर असल्याकारणाने शाळा, कॉलेजचे काही अल्पवयीन तर काही तरुण मुले या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे.
(इच्छा असली तरी मार्ग सापडतो)
गुटखा विक्री थांबण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने भरारी पथके तयार करुन संपूर्ण जिल्ह्यात झाडाझडती केली पाहिजे मात्र मनुष्यबळ कमी असल्याचे कारण पुढे करत अन्न व औषध प्रशासन पळवाट काढून जबाबदारी झटकत असल्याचे बोलले जाते मात्र अन्न व औषध प्रशासनाने पोलीसांना सोबत घेऊन कारवाई कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.