साखरपुड्याला आले आणि लग्न लावून गेले. कुऱ्हाड येथील अनोखा विवाह सोहळा.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०५/०८/२०२२
सद्यस्थितीत सगळीकडे लग्न समारंभ म्हटला म्हणजे बडेजाव करण्याच्या नादात हौसमौज करतांना महागड मंगल कार्यालय, महागडी वाजंत्री, धोडा, थाटमाट, जेवणावळी सोबतच मानपान, रुसवेफुगवे, आहेर देणेघेणे, कन्यादान करतांना अटीतटीची भाषा अशा अनन्यसाधारण रुढी परंपरेच्या नावाखाली होणारा लाखो रुपये अनाठायी खर्च हे आलेच, परंतु पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावात मात्र या जुन्या रुढी परंपरा झुगारुन एक अनोखा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याची कुऱ्हाड खुर्द गावासह पंचक्रोशीतील गावागावातून कौतुकास्पद चर्चा सुरु असून आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या व महागाईच्या काळात असेच विवाह सोहळे होण्याची गरज आहे असे मत सुज्ञ नागरिकांनी व समाजबांधवांनी व्यक्त केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील लोकमतचे पत्रकार मा. श्री. सुनील लोहार यांची भाची कु. वैष्णवी उमेश लोहार हिला पाहण्यासाठी दिनांक ०४ ऑगस्ट २०२२ गुरुवार रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील नाचनवेल येथील चि. जगदीश भोलेनाथ बिलांगे हे पाहण्यासाठी व विवाह निश्चित करण्यासाठी आले होते. पाहूणे आल्यावर रितीरिवाजाप्रमाणे स्वागत व चहापाणी झाल्यावर वर गप्पागोष्टी सुरु झाल्या वर पक्षाकडून आलेले पाहुणे काय सांगतात व काय मागतात या तणावाखाली वधूपक्ष तणावाखाली असतांनाच अचानकपणे वर पक्षाकडून साखरपड्यातच लग्न उरकवून घेण्यासाठीचा प्रस्थाव ठेवण्यात आला हा प्रस्ताव समोर येताच वधु पक्षाकडील मंडळी अचंबित झाली व सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.
लगेचच ‘नेक काम मे देरी क्यू’ असे म्हणत वधुवरांकडच्या मंडळींनी शहरात जाऊन साखरपुडा व लग्नाच्या वस्तूंची खरेदी करुन सायंकाळी कुऱ्हाड खुर्द येथेच उपस्थित नातेवाईक व गावातील प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत साखरपुड्यातच विविध सोहळा पार पडला. या साखरपुड्यात विविध सोहळ्याचे कुऱ्हाड खुर्द गावासह पंचक्रोशीतील गावातून कौतुक केले जात आहे.
(जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. निराधार आभाळाचा तोच भार साहे.)
कुऱ्हाड खुर्द येथील लोकमतचे पत्रकार मा. श्री. सुनील लोहार यांच्या बहिणीचा विवाह झाल्यानंतर त्या शिरुर येथे सासरी रहात होत्या. त्यांचीच मुलगी कु. वैष्णवी आहे. अकरा वर्षापूर्वी वैष्णवीच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले होते. म्हणून मा. श्री. सुनील लोहार व मा. श्री. प्रविण लोहार यांनी कु. वैष्णवी व तीच्या आईला कुऱ्हाड येथे स्थायिक केले आहे. अत्यंत गरिबीची परिस्थिती त्यातच घरात उपवर मुलगी असल्याने हिचे लग्न कसे करावे, लग्न ठरलेच तर इतका खर्च कुठून उभा करावा या विवंचनेत लोहार परिवार असतांनाच अचानकपणे पाहुणे आले लगेचच विवाह निश्चित झाला व वर पक्षाकडून स्वताहून साखरपुड्यातच लग्नाचा प्रस्ताव समोर आला व लग्नही झाले ह्या घडामोडी घडत असतांना वधूकडिल आंनदीत होऊन सगळे सोपस्कार पार पाडत होती हा प्रसंग म्हणजे एखाद्या चित्रपटात दाखवण्यात येतात तसाच काहीसा प्रसंग समोर दिसत होता. हा प्रसंग पहाता जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. निराधार आभाळाचा तोच भार साहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.