सिंगल यूज प्लास्टिकच्या पाऊचमध्ये गावठी दारु व ताडीची खुलेआम विक्री सुरुच.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०७/२०२२
संपूर्ण भारतामध्ये ०१ जूलै २०२२ शुक्रवार पासून सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली असून देशभरात प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असल्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या निर्देशानुसार ज्या ठिकाणी दुकानातून किंवा इतर ठिकाणी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करतांना आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध तसेच नागरीकांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशान्वये एका बाजूला केंद्राच्या आदेशाची कडक अंमलबजावणी होत असतांनाच दुसरीकडे मात्र जळगाव जिल्ह्यातील खेड्यापाड्यात अवैधरित्या दारु गाळुन गावठी दारुची अवैध विक्री करणारे विक्रेते तसेच शासनमान्य अधिकृत व शासनमान्य नसलेल्या अनाधिकृत ताडी, माडीचे विक्रेते या सिंगल यूज प्लास्टिकच्या थैलींचा (कॅरी बॅग) चा वापर करुन या कॅरी बॅगाचा पाऊच (दारु विक्रेते व पिणारांच्या भाषेत) फुगा, पोतरी बनवून या सिंगल यूज प्लास्टिकच्या थैलींचा खुलेआम वापर करतांना दिसून येते आहेत.
या सिंगल यूज प्लास्टिकच्या थैलींचा दारु व ताडी विक्रीच्या दुकानातून वापर होत असल्याने दारु व ताडीच्या व्यसनाच्या आहारी गेलेले लोक हे पाऊच घेऊन दारु, ताडी पिऊन झाल्यानंतर ह्या रिकाम्या प्लास्टिकच्या थैल्या भररस्त्यावर, गटारीमध्ये व इतर ठिकाणी फेकुन देत असल्याने या परिसरात जणूकाही प्लास्टिकच्या थैलींचा पाऊसच पडल्याचा अनुभव यतो व या थैल्यांमुळे सांडपाण्याच्या गटारी, लहान, लहान नद्या, नाल्यांच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन नियमित वापराचे विशेष करुन पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जात नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे ह्या प्लास्टिकच्या थैल्या उकिरड्यावर किंवा इतर ठिकाणी पडून त्या गुराढोरांच्या खाण्यात येऊन त्या पोटात गेल्यानंतर जनावरांच्या चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होऊन पोटफुगी (फॉरेन बॅडी) सारखे आजार होउन यात पाळीव, दुभती जनावरे मृत्युमुखी पडतात व शेतकऱ्यांचे व पशुधन पालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. म्हणून अवैधरित्या गावठी दारु व ताडी विक्रीच्या दुकानातून या सिंगल यूज प्लास्टिकच्या थैलींचा होणारा वापर थांबवण्यासाठी तसेच गावठी हातभट्टीची दारु निर्मिती व विक्री थांबवण्यासाठी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
क्रमशः
दारु व ताडी विक्रिसाठी सिंगल यूज प्लास्टिकच्या थैलींचा वापर कुठे व कसा होतो पुढील बातमीत जिल्हा, तालुका व तालुक्यातील गावांच्या नावासह व सबळ पुराव्यासह वृत्त आपल्या समोर लवकरच येण्याची शक्यता.