अंबे वडगाव गावात विद्युत चोरीसह पथदिवे दिवसाही सुरु, विद्युत वितरण कंपनीची डोळेझाक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०७/२०२२
एका बाजूला विद्युत वितरण कंपनीकडून विज वाचवा, विज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. म्हणून मोठमोठे फलक लावून जाहिरात करते तर दुसरीकडे विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून दिवसाढवळ्या सुरु असललेली विद्युत चोरी तसेच ग्रामपंचायतीचे १४ ते १५ खांबावरील पथदिवे रात्रंदिवस सुरु असल्याचा प्रकार विद्युत वितरण कंपनीचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता काही गावातून या विद्युत चोरांचे व संबंधित विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी यांचे लागेबांधे असल्याने हप्ते घेऊन, देऊन हा नंगानाच सुरु असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेतून ऐकावयास मिळते.
तर दुसरीकडे अधिकृत मान्यताप्राप्त विद्युत ग्राहकांना कोणती विद्युत उपकरणे वापरायची कोणती नाही ही नियमावली लागू करुन विद्युत बिल देताना त्या बिलावर अवास्तव कर आकारणी करुन बिल वसूल करण्यासाठी मुघलकी कायदा आमच्याच बापाचा समजून विद्युत पुरवठा खंडित केला जातो. व बिल भरल्यानंतर विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी पुन्हा कर आकारणी करुन सक्तीची वसुली केली जाते असे विद्युत ग्राहक सांगतात.
तसेच विद्युत वाचवा म्हणणारे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी अंबे वडगाव गावातील १४ ते १५ खांबावरील पथदिवे मागील दोन वर्षांपासून रात्रंदिवस (अहोरात्र) सुरु असल्याचे पाहून सुध्दा ते बंद करण्यासाठी तसदी घेत नाहीत. हे रात्रंदिवस सुरु असलेले पथदिवे बंद करण्यास अंबे वडगाव येथे कार्यरत असलेले परंतु (पौर्णिमेच्या चंद्रासारखे) उगवणारे लाईनमन अविनाश राठोड यांना वारंवार सांगूनही हे पथदिवे मागील दोन वर्षांपासून रात्रंदिवस सुरु आहेत.
विशेष म्हणजे अंबे वडगाव ग्रामपंचायतीकडे विद्युत वितरण कंपनीची थकबाकी असल्याने एकीकडे पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पंधरा विद्युत खांबावरील पथदिवे मागील दोन वर्षांपासून रात्रंदिवस सुरु आहेत. तरीही वरिष्ठ अधिकारी या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येते.
विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी सतत पाच वर्षांपासून एकाच गावात,
अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, वडगाव जोगे, कोठडी तांडा या पाच गावांसाठी वायरमन, विद्युत सहाय्यक व मदतनीस असे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मागील पाच वर्षांपासून या गावांसाठी दिलेले विद्युत कर्मचाऱ्यांची कार्यकाळ संपल्यानंतर नियमानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र अविनाश राठोड नावाचा कर्मचारी हा विद्युत सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आल्यापासून आता त्याची बढती झाली असून तो आता वायरमन पदावर कार्यरत आहे. नियमानुसार तीन वर्षांनंतर व बढती मिळाल्यावर या राठोडची बदली होणे क्रमप्राप्त होते परंतु अद्यापही बदली झाली नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे.
यामागील कारण म्हणजे अविनाश राठोड हा कर्मचारी नियमितपणे मुख्यालयात येत नाही. वेळीअवेळी विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्यास गावातील लोकांना तासंतास अंधारात बसावे लागते तसेच पिठाच्या गिरण्या बंद होतात व गोरगरिबांच्या घरातील चुल पेटत नाही.
(अंबे वडगाव येथील अविनाश राठोड यांची बदली होण्यासाठी ग्रामपंचायतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोन ते तीन वेळा ठराव पाठवून सुध्दा वरिष्ठ अधिकारी या कामचुकार कर्मचाऱ्यांवर मेहरबान असल्याने याची बदली होत नसल्याने सुज्ञ नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.)
अविनाश राठोड यांची या गावात नियुक्ती झाल्यानंतर या पाचही गाव, तांड्यातुन विद्युत चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी मुख्यालयात नियमितपणे न येणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊन त्याची त्वरित बदली करुन मुख्यालयात कायमस्वरूपी हजर राहून काम करणारा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.