कुऱ्हाड येथील शेतकऱ्याच्या शेतातून लाख रुपये किमतीची ट्रॉली चोरट्यांनी रात्रीच्यावेळी लांबवली.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०४/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील शेतकरी श्री. अशोक देवचंद महाजन यांची पाचोरा रस्त्यावरील शेत जमीन आहे. याच ठिकाणी त्यांनी गुरेढोरे बांधण्यासाठी शेड बनवले आहे. याच शेड जवळच सुमारे एक लाख रुपये किंमतीची ट्रॉली उभी केलेली होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रात्रीच्या वेळी ही ट्रॉली चोरून नेली. सकाळी नोकर दूध काढण्यासाठी गेला असता ही घटना उघडकीस आली. सदर शेतकरी बाहेरगावी गेलेला असल्याने आज घरी परत आल्यानंतर पिंपळगाव पोलिस स्टेशन अंतर्गत लोहरा दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
कूर्हाड खुर्द येथे मागील आठवड्यात घरातून लाखाच्या चोरीची घटना ताजी असतांनाच चोरट्यांनी चक्क परवा ट्रॉलीच चोरून नेली. अगोदरच शेतकरी या वर्षीच्या अतिवृष्टीने बेजार झालेला असून जेमतेम उत्पन्न हाती आले आहे. यात या ट्रॉली चोरी मुळे शेतकऱ्याला मानसिक धक्का बसलेला आहे. परिसरात होणाऱ्या लहान-मोठ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थ धास्तावलेले आहेत.
तक्रार दाखल केल्याबरोबर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी आज दुपारी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आला आहे. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शैलेश चव्हाण व प्रवीण देशमुख करीत आहे. या परिसरात पिंपळगाव पोलीस स्टेशन मार्फत रात्रीची गस्त घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे. जेणेकरून परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसेल.