विद्युत वितरण कंपनीच्या थकित बिलापोटी मागील एक महिन्यापासून अंबे वडगाव अंधारात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०६/२०२२
अंबे वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीवर मागील साडेचार वर्षांपासून सरपंचपदाची सुत्रे लोकनियुक्त सरपंचाच्या हातात गेल्यापासून बोटावर मोजण्याइतक्या विकास कामांच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र गावातील अनेक समस्या कायमस्वरूपी तश्याच असून अत्यावश्यक विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
असाच एक विषय म्हणजे विद्युत वितरण कंपनीच्या थकित बिलापोटी विद्युत बिल वसूल करण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असल्याने अंबे वडगाव गावातील पथदिवे (स्ट्रीट लाईट) मागील एक महिन्यापासून बंद असल्याने ग्रामस्थांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे आता पावसाळा सुरू झाला असून अंबे वडगाव गावात संपूर्ण शेतकरी वर्ग रहिवासी आहेत. यांची गुरेढोरे घरासमोर बांधलेली असतात. या गुरांना वेळोवेळी चारापाणी करण्यासाठी रात्री बे रात्री उठून चारापाणी करतांना अंधारातच चाचपडत दैनंदिन कामकाज करावे लागत आहे. सद्यस्थितीत पावसाळा सुरु झाला असून या कालावधीत साप व विंचूकाट्यांची भिती जास्त असते म्हणून गावातील पथदिवे सुरु असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच गावात सगळीकडे अंधार असल्याने गुराढोरांसह इतर ठिकाणी चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पशुधन पालक व गावकऱी रात्रभर चिंतेतच असतात.
अंबे वडगाव ग्रामपंचायतीकडून कर वसुली करतांना स्वतंत्रपणे दिवाबत्ती कर या कॉलममध्ये दिवाबत्ती कर वसूल केला जातो मग हा वसूल केलेला दिवाबत्ती कर जातो कुठे हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. तरी ग्रामपंचायतीने विद्युत वितरण कंपनीची थकबाकी भरून त्वरित पथदिवे सुरु करावेत अशी मागणी केली जात आहे.