वडगाव आंबे बसस्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे मोठ्या अपघाताची शक्यता, सार्वजनिक बांधकाम विभागाची डोळेझाक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०४/२०२४
(सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांनी येत्या आठवडाभरात वडगाव आंबे बसस्थानक परिसरातील अतिक्रमण न काढल्यास व या परिसरात अपघात किंवा काही दुर्घटना झाल्यास याला जबाबदार धरुन सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी)
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावालगत वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक, कोकडी तांडा व वडगाव जोगे अशी गावे आहेत. तसेच जवळच डांभुर्णी, पिंप्री, कोल्हे ही गावे आहेत. या आठही गावातील ग्रामस्थांना दैनंदिन कामासाठी बाहेरगावी जाण्यासाठी वडगाव आंबे येथील बसस्थानकावर यावे लागते तसेच वरील आठही गावातील शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वडगाव आंबे बसस्थानकावरुनच जावे व यावे लागते. ही सर्व प्रवासी संख्या पहाता वडगाव आंबे बसस्थानक परिसरात मोठी गर्दी जमते.
मात्र या वडगाव आंबे बसस्थानक परिसरात म्हणजेच प्रवासी निवाऱ्याजवळ काही व्यवसायीकांनी अतिक्रमण केले असल्याने प्रवाशांना व विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसची वाट पाहत बसले असता खुपच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तसेच जवळच जिल्हापरिषदेची इयत्ता पहिली ते चौथी प्रर्यत मराठी मुलांची शाळा असून मराठी शाळेच्या चारही बाजूंनी अतिक्रमण झाले असल्याने मराठी शाळा हरवली की काय अशी शंका निर्माण झाली आहे. तसेच या मराठी शाळेत येणाऱ्या लहान, लहान विद्यार्थ्यांना रस्त्यावरुन शाळेत जातांना व शाळेतून घरी जातांना येणारे, जाणारे वाहन दिसत नाही तसेच वाहनचालकांना शाळेतून येणारे विद्यार्थी दिसत नसल्याने एखाद्यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे अतिक्रमण काढण्यासाठी वडगाव आंबे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून वारंवार ठराव दिलेले आहेत व आत्ताही सरपंच मा. बबलू तडवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वता भेटून तसेच भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन अतिक्रमण त्वरित काढण्यासाठी विनंती केली आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा हे अतिक्रमण काढण्यासाठी का दिरंगाई करत आहे हे न समजणारे कोडे आहे.
म्हणून वडगाव आंबे येथील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.