सरपंच शेतात, ग्रामसेवक बेतात, गावातील समस्या सोडविण्यासाठी येणार कोण ?

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव, कोठडी तांडा, वडगाव जोगे ही तीन गावे मिळून गृप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीवर मागील साडेचार वर्षांपासून लोकनियुक्त सरपंच म्हणून महिला आहेत. या वयोवृद्ध असल्याकारणाने त्यांच्या सरपंच पदाचा कारभार त्यांचा मुलगा विनायक शळके हे पहात आहेत. या ग्रामपंचायतीचे मुख्यालय अंबे वडगाव गावात असून या मुख्यालयात दररोज ग्रामसेवक येऊन बसतात तेव्हा गावातील रहिवासी अनेक समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जातात परंतु याठिकाणी जबाबदार सरपंच व सदस्य हजर रहात नसल्याने आलेल्या काही समस्या सोडविण्यासाठी ग्रामसेवक निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणजेच लोकनियुक्त सरपंच असल्याने मन राजा, मन प्रधान असा कारभार सुरु आहे. म्हणून कि काय ज्या सदस्यांना हा गलथान कारभार पटत नसल्याने त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे पाठ फिरवली असल्याचे अनुभवायला येत आहे.
हा व्हिडिओ संपूर्ण बघावा ही नम्र विनंती.
***************************
म्हणून अनेक समस्यांनी त्रस्त ग्रामस्थ व महिला सरपंच पदाचा कार्यभार सांभाळणारे विनायक शळके यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपले गाऱ्हाणे मांडून समस्या सोडविण्यासाठी विनंती करतात मात्र वारंवार फोन करुन प्रत्यक्ष भेटून ही काही एक फायदा होत नसल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. बऱ्याच वेळा मी शेतात आहे, मी कामात आहे, मी बाहेरगावी आहे, नंतर बघू, मी ग्रामसेवक आप्पांना सांगतो अशी उत्तरे मिळत असल्याने ग्रामस्थांच्या पदरी निराशाच येते.
गावातील विशेष अडचणी म्हणजे गावात झपाट्याने अतिक्रमण वाढत असल्याने वाहन तर सोडाच पायी चालणे मुश्कील झाले आहे. तसेच गावातील सांडपाण्याच्या गटारींची नियमितपणे साफसफाई केली जात नसल्याने गावात ठिकठिकाणी डबके साचले असून गटारी तुडुंब भरल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहे. तसेच काही भागात भुमिगत गटारी बणवण्यात आल्या आहेत. मात्र ह्या गटारी बनवतांना किंवा बनवून घेतांना ग्रामपंचायतीने कोणतीही काळजी घेतली नसल्याने ठेकेदाराने कोणत्याही प्रकारे चढ, उतार न पहाता व कमी रुंदीचे साधारण कंपनीचे पाईप वापरुन जमीनीत चांगल्याप्रकारे खोदकाम न करता वरचेवर पाईप लाईन टाकून निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याकारणाने सांडपाणी वाहून जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आता नुकताच पावसाळा सुरु झाला असून सांडपाणी व पावसचे पाणी या निकृष्ट दर्जाच्या कमी रुंदीच्या पाईपातून वाहून जाणे शक्य नसल्याचे सांगत पावसाळ्यात हे पाणी आमच्या घरात घुसल्याशिवाय रहाणार नाही म्हणून आम्हाला ह्या भुमिगत बनवलेल्या गटारी मान्य नसून सिमेंटच्या उघड्या गटारी बनवून द्याव्यात म्हणजे आम्ही आमच्या घरासमोरील गटारींची साफसफाई करु शकतो असे मत व्यक्त केले आहे.
महत्वाचे~
गावातील सांडपाण्याच्या गटारींची योग्य पध्दतीने साफसफाई होत नसल्याने तसेच काही गटारी बनवतांनाच चुकीच्या पध्दतीने बनवल्या गेल्याने सांडपाणी वाहून जात नसून पाण्याची डबकी तुंबली आहेत. या डबक्यावर डासांची उत्पत्ती झपाट्याने होत आहे. तसेच दुर्गंधीमुळे घरात व परिसरात थांबणे मुश्किल झाले असून या तुंबलेल्या गटारीतील शेपटाचे जंत व किडे थेट रहिवाशांच्या घरात शिरत असल्याने तसेच डासांचा उपद्रव वाढला असून डास चावल्यानंतर घराघरात लहान मुले व रहिवाशांना वेगवेगळे आजार होत आहेत व उपचारासाठी दवाखान्याच्या चकरा माराव्या लागत आहेत.
म्हणून वरिल सर्व अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने येत्या आठ दिवसात उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त ग्रामस्थ व महिलांनी दिला आहे.