अज्ञात क्रुझरच्या धडकेत पहाण यथील ४६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०६/२०२२
पाचोरा येथील भाग्यलक्ष्मी गार्डन हॉटेल जवळ अज्ञात क्रुझरच्या धडकेत पाचोरा तालुक्यातील पहाण येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज रोजी घडली आहे. या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा येथील शेतकरी व ध्येय न्यूजचे संपादन मा. श्री. संदिप महाजन यांच्या मावस भावाचा मुलगा पाचोरा तालुक्यातील पहाण येथील रहिवासी शेतकरी प्रमोद दत्तू पाटील वय वर्षे (४६) यांना बैलजोडी विकत घ्यायची असल्याकारणाने ते बैलजोडी पहाण्यासाठी आज सकाळी चाळीसगाव येथे गेले होते. दरम्यान काम आटोपल्यावर ते परत पहान गावी परतत असतांनाच दुपारी अंदाजे ३ वाजून ४५ मिनिटाचे सुमारास पाचोरा येथील भडगाव रोड वरील भाग्यलक्ष्मी गार्डन हॉटेलजवळ एका अज्ञात क्रुझरने जोरदार धडक दिल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागुन ते जबर जखमी होऊन जागेवरच कोसळले.
हि घटना माहीत पडताच पाचोरा येथील जय मल्हार रुग्णवाहिकेचे चालक अमोल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रमोद पाटील यांना तातडीने रुग्णवाहिकेत टाकून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात असता पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मा. श्री. अमित साळुंखे यांनी प्रमोद पाटील यांना मृत घोषित केले. ही घटना पहाण येथे माहीत पडताच ग्रामस्थांनी पाचोरा रुग्णालयात एकाच गर्दी केली होती.
या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अज्ञात क्रुझरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत प्रमोद पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत प्रमोद पाटील यांच्या पाश्चात्य वृध्द आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ व एक बहिण असा परिवार आहे.
मयत प्रमोद पाटील एक मनमिळावू स्वभाव व हसमुख, सुस्वभावी व्यक्तीमत्व असल्याने व त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने पहाण गावातून हळहळ व्यक्त केली जात असून पहाण गावासह परिसरातील गावागावात शोककळा पसरली आहे.
अज्ञात क्रुझर ही पहूर येथील असल्याची माहिती समोर येत असून त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.