प्राध्यापक मा.श्री. अशोक कुमावत यांच्या ‘उठा तुम्हीही जिंकणारच’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात नासिक येथे संपन्न
दिलीप जैन.(पाचोरा)
२०/११/२०२०
जग बदलू पाहणाऱ्या कर्तृत्वाची संघर्षगाथा म्हणजे ‘उठा तुम्हीही जिंकणारच’हे पुस्तक साहित्यक्षेत्रात मानाचं स्थान मिळविणार! असे मत लीनाजी बनसोड (मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.नाशिक) यांनी प्राध्यापक मा.श्री.अशोक कुमावत लिखित ‘उठा तुम्हीही जिंकणारच’या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे वेळी व्यक्त करत कुमावत यांना शुभेच्छा दिल्या.
शून्यातून जग जिंकण्याचा ध्यास ज्यांच्या रक्तातून उफाळून त्यांच्या प्रत्येक धमणीतून सकारात्मक उर्जाची सरिता सातत्याने वाहते आणि यशाच्या अमृत सागराची निर्मिती होते अशा यशस्वी कर्मयोध्यांची संघर्षगाथा म्हणजे ‘उठा तुम्हीही जिंकणारच’ हे पुस्तक.
या प्रेरणादायी लेखमालेतुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लेखकाचे लेख पोहचले याचा आम्हा नाशिककरांना सार्थ अभिमान आहे. एका प्राथमिक शिक्षकाकडून संपूर्ण महाराष्ट्राला वाचनाचे वेड लावणारी आतापर्यंतच्या 855 लेखांची प्रेरणादायी लेखमाला रोज वाचकांपर्यंत पोहचते हा आमच्या जिल्हा परिषदेचा सन्मान आहे. असे गौरवोद्गार नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.लीनाजी बनसोड यांनी काढले. या प्रसंगी त्यांनी स्वतःच्या जीवनाचा खडतर प्रवास वर्णन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
पंचवटी, नासिक येथे झालेल्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, कवी,लेखक अशोक कुमावत यांच्या ‘चला तुम्हीही जिंकणारच’
या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
महाराष्ट्रासह देशातील व आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपल्या कमजोरीला झुगारून यशाच्या उत्तुंग शिखरावर आपल्या कर्तृत्वाने दिग्विजयी पताका ज्यांनी फडकावली अशा संघर्षयोध्याची कर्मकहाणी लेखकाने आपल्या दर्जेदार लिखाणातून प्रभावीपणे मांडली आहे. या पुस्तकातून अबालवृद्धांना नक्कीच यशाचा नवा मंत्र सापडेल यात शंकाच नाही असेही त्यांनी या प्रसंगी सांगतांना पुस्तक आणि लेखक अशोक कुमावत यांचे कौतुक केले.
नाशिकचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी इतिहास घडविणारी माणस इतिहास विसरू शकत नाही असे सांगतांना जीवनात अचानक उद्भवलेल्या आजारांना,संकटाना न डगमगता सकारात्मक ऊर्जेच्या साहाय्याने यशाची उत्तुंग भरारी कशी घ्यावी हे जर जाणून घ्यायचे असेल तर’उठा तुम्हीही जिंकणारच’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे व संग्रही ठेवावे असे वर्णन करतांना लेखकाचे 50 ते 60 हजार वाचक उभ्या महाराष्ट्रात रोज सकाळी पहाटेचा नवा विचार वाचतात ही शिक्षण क्षेत्र आणि समाजाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
वाचनातून माणूस घडतो आणि अशा कर्तृत्ववान व्यक्तीच्या संघर्षगाथा वाचून आपल्या वाचनालयातून शेकडो अधिकारी घडल्याचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगताना आमच्या लेखकाच्या प्रती महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यासह सातासमुद्रापार सिंगापूरपर्यंत प्रकाशन होण्याच्या आत बुकिंग झाल्या.ही कदाचित महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील पहिलीच घटना असेल असे सांगून लेखकाच्या या प्रति 175 शासकीय वाचनालयात पोहचविण्यासाठी प्रयत्न करू अशा शुभेच्छा दिल्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी मा.रवींद्र नाईक यांनी खेळातून जसे शरीर कमावता येते तसेच पुस्तकातून समाज उभा करता येतो असे सांगून पुस्तकातील उल्लेख केलेल्या महान खेळाडूंचे वर्णन केले. अनेक पराक्रमी खेळाडू कसे घडले हे लेखकाने आपल्या अनोख्या शैलीतून उल्लेखनीय कार्य केले आहे.असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरी,तुकारामगाथा,भारताचे संविधान, गीता,भागवत,महात्मा फुले, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ग्रंथांचे पूजन प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत करण्यात आले.
‘उठा तुम्हीही जिंकणारच’ या पुस्तकाचे प्रकाशन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करून लेखक अशोक कुमावत यांचा सपत्नीक सत्कार केला.
प्रस्ताविकेत लेखकाने आपल्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत शिक्षणाने दूर केली हे सांगताना शिक्षणाचा प्रवास ,व्यावसायिक नवी उंची, शिक्षण क्षेत्रात अहोरात्र घेतलेली मेहनत आपणास राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारापर्यंत घेऊन गेल्याचा प्रवास व पुस्तकाचा जन्म कसा झाला हे सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.लीनाजी बनसोड,उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे,जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक,माजी आमदार बाळासाहेब सानप,पंचवटी प्रभागाच्या नगरसेविका पुनमताई मोगरे,नगरसेविका प्रियंकाताई माने,पर्यावरण व बेटी बचाव चळवळीचे प्रणेते डॉ.संदीप भानोसे,सामाजिक कार्यकर्ते धनंजय माने,दिगंबर मोगरे,कुमावत समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कारवाळ,सचिव पंडितराव कुमावत,लोकमतचे पत्रकार बाळासाहेब कुमावत, वैशाली प्रकाशनचे प्रकाशक विलास पोतदार,कवी,लेखक प्रा.राज शेळके,आदर्श शिक्षक संतोष बेलदार,मोटिव्हेशनल स्पीकर राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त नामदेव बेलदार,मुख्याध्यापक भगवान पाटील,,दिगंबर बागड,दामोदर बच्छाव,भूषण कुमावत, दिलीप कुमावत,विमल कुमावत, निकिता कुमावत, साक्षी कुमावत, प्रथमेश बेलदार,अथर्व कुमावत आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक रविंद्र मालूनजकर यांनी तर आभार- मोटिव्हेशनल स्पीकर,लाईफ कोच नामदेव बेलदार राज्य पुरस्कार विजेते यांनी केले.