आले पोलीसांच्या मना, तेथे कोणाचे चालेना. अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले. भाग ३.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०५/२०२२
(गावठी दारुचे अड्डे उध्वस्त मग पानटपरी व भरवस्तीत विकल्या जाणाऱ्या देशी, विदेशी दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई कधी ?)
कुऱ्हाड खुर्द गावात सट्टा, पत्ता, जुगार, गावठी व देशी, विदेशी दारुच्या विक्री सह सर्वप्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत. या अवैधधंद्यामुळे कुऱ्हाड खुर्द गावासह आसपासच्या आठ ते दहा खेड्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या आठ ते दहा खेड्यांसह कुऱ्हाड गावात अशांतता पसरली होती व लहान, लहान, अल्पवयीन, तरुणवर्गात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले होते. ही बाब लक्षात घेऊन कुऱ्हाड येथील महिलावर्ग व शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. अरुण भाऊ पाटील यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. याची दखल घेत वरिष्ठांच्या आदेशानुसार व डी. वाय. एस. पी. मा. श्री. भरतजी काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेत अवैध धंदे करणारांविरुध्द धाडसत्र सुरु करुन कारवाईचा बडगा उगारला आहे.
याच कारवाई अंतर्गत आज दिनांक ०७ मे २०२२ शनिवार रोजी सकाळी पो. हे.कॉ. शैलेश चव्हाण, पो. हे. कॉ. कुलकर्णी व सहकाऱ्यांनी कुऱ्हाड येथून जवळच असलेल्या उमरदड धरण परिसरातील गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर धाड टाकून हजारो रुपयांचे कच्चे रसायन, पक्के रसायन तसेच दारु गाळण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट केले आहे. पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांच्या या सततच्या कारवाईमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले असून त्यांना पळता भुई थोडी झाली आहे.
असे असले तरी या अवैध धंदे करणारांचे काही हितचिंतक, स्वताला प्रतिष्ठित समजणारे किंवा समजून घेणारे पाठिराखे हे आपापल्या मर्जीतील तालुकास्तरीय तसेच स्थानिक प्रतिष्ठित लोकांना भेटून अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा जनमानसातून ऐकायला मिळत आहे. तरी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता सतत कडक कारवाई करुन कुऱ्हाड खुर्द गावातील सर्वप्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करुन आमचे व आमच्या भावी पिढीचे संसार वाचवावेत अशी अपेक्षा महिलावर्ग व सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच कुऱ्हाड या गावातून संपूर्ण अवैध धंदे बंद झाल्यावर आम्ही पोलीसांचा जाहीर सत्कार करुन त्यांचे जाहीर आभार व्यक्त करु असे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ पाटील यांनी सांगितले.
पुढील बातमी (मी नाही त्यातली अण कडी लावा आतली, अवैध धंदे करणारांचे पाठीराखे कोण ? भाग ४)