बनून आला पाहुणा आणी पाच लाखाचा लावला चुना. पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील घटना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील एका घरातून चोरट्याने पाहुणा असल्याची बतावणी करून तब्बल पाच लाख रूपयांचे ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
या संदर्भात माहिती अशी की, तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील ग्रामस्थ शेतात कामासाठी गेलेले असतांना अज्ञात इसमाने भर दुपारी एक वाजता बाहेर ठेवलेली चाबी घेऊन घरात प्रवेश केला व घरातील कपाट उघडून कपाटातील पाच लाख रुपये घेऊन पसार झाला. लोहारी बु येथील एकनाथ माणिक मगर (वय – ५०) हे आपल्या कुटुंबीयांसह शेतात कामासाठी गेलेले होते. तर त्यांची १५ वर्षाची मुलगी ही शाळेत गेली असल्याने त्यांनी घराची चावी नियमितपणे घराबाहेर ठेवलेली होती.
दरम्यान, दुपारी एक वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटा घराची चावी शोधत असतांना गल्लीत राहत असलेल्या वयोवृद्ध महिलेने त्यास तू कोण आहेस ? व घर का उघडतो आहेस ? अशी विचारणा केली असता त्याने मी त्यांचे घरी पाहुणा आलो आहे असे सांगितले. यामुळे त्या महिलेने त्याला पुन्हा विचारणा केली नाही. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन कपाट उघडून कपाटातील पाच लाख रुपये घेऊन पसार झाला. दरम्यान कपाटाचा आवाज येत असतांना म्हातारीने पुन्हा त्यास टोकले. त्यावर चोरट्याने एकनाथ मगर हे घरी आल्याचे सांगून तो घटनास्थळावरून पसार झाला.
यानंतर दुपारी दोन वाजता मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर ती दरवाजा व कपाट उघडे पाहून भयभीत होऊन गावातील मंडळींना सांगितले. त्यावेळी नागरिकांनी एकनाथ मगर यांना भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिली. चोरट्याला घराची चावी व कपाटाची चावी कोठे ठेवतात हे माहित असावे याचा अर्थ तो गावातील अथवा जवळील असावा असा कयास लावण्यात येत आहे.
या घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार विजय माळी हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान परिसरात होणाऱ्या वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिस प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.