लोहारी येथील घरफोडी प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील नविन प्लॉट भागातील मुकुंदा आनंद पाटील यांच्या घरात दिनांक २३ एप्रिल शनिवार मध्यरात्रीपासून ते दिनांक २४ एप्रिल २०२२ रविवार सकाळी साडेपाच वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून २ लाख ८३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व २७ हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याची बाब रविवारी सकाळी साडेपाच वाजेच्यासुमारास सौ. सुरेखा मुकुंद पाटील ह्या नियमितपणे उठून खाली आल्यानंतर लक्षात आली होती.
या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवर कळवण्यात आले होते. ही खबर मिळताच पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन घरमालक मुकुंदा पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ८९/२०२२ भा. द. वी. ३८०, ४५७ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या आदेशान्वये सहायक पोलिस निरीक्षक मा. श्री. महेद्रजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला नव्यानेच हजर झालेले पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.