वडगाव आंबे गावातील अवैध धंदे बंद होण्यासाठी माय, माऊलींचे देवाला साकडे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०१/२०२३

पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे, वडगाव आंबे खुर्द व वडगाव आंबे बुद्रुक गाव, तांड्यावर गावठी व देशी दारुची विक्री तसेच सट्टा, पत्ता, जुगार हे अवैध धंदे दिवसाढवळ्या, रात्रंदिवस राजरोसपणे सुरु आहेत. हे अवैध धंदे सुरु असल्याकारणाने गाव, तांड्यावर अशांतता पसरली असून व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपूर्तीसाठी घरातील महिलांच्या अंगावरील दागदागिने, घरातील तांब्या, पितळाची भांडी, शेती उपयोगी अवजारे तसेच स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे गहू, तांदूळ विकून वेळ पडल्यास चोऱ्या, माऱ्या करुन आपली तलफ भागवत आहेत.

या प्रकारामुळे गाव, तांड्यावर अशांतता पसरली असून घराघरात भांडणतंटे होत आहेत. गाव, गावठी व देशी दारुची विक्री तसेच सट्टा, पत्ता, जुगार हे अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याकारणाने अल्पवयीन व तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य बरबाद होत आहे. हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत म्हणून आजपावेतो महिला पुरुषांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला वारंवार लेखी तक्रार दाखल केल्या आहेत. तसेच वडगाव आंबे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभेचे ठराव पाठवण्यात आले आहेत. तरीही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसून हे अवैध धंदे बंद होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.

वडगाव आंबे गावचा बसस्थानक परिसर व मंदिर परिसरात तसेच वडगाव आंबे खुर्द व वडगाव आंबे बुद्रुक येथे भररस्त्यावर गावठी दारुची विक्री केली जात आहे. तसेच भरवस्तीत जुगाराचे अड्डे सुरु असून वडगाव आंबे मराठी शाळेच्या बाजूला व भ्रमणध्वनीचा वापर करुन सट्टा बेटिंग घेतली जाते या सट्टा बेटिंगच्या व्यवसायात दररोज ५००००/०० ते ७५०००/०० हजार रुपयांची तसेच अवैध दारु विक्रीत जवळपास चाळीस हजार रुपयांची उलाढाल होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या चोवीस तास सुरु असलेल्या गावठी व देशी दारुच्या विक्रीमुळे व्यसनाधीन लोक सकाळपासूनच बसस्थानक परिसरात व गावातील हमरस्त्यावर धिंगाणा घालत असतात विशेष म्हणजे वडगाव आंबे खुर्द व वडगाव आंबे बुद्रुक येथे गाव, तांड्यावर दारुडे भररस्त्यावर धिंगाणा घालतात याच रस्त्यावरुन गावातील महिला शेतात जातात व घरी येतात तसेच याच परिसरात शौचालये असल्याने महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गावातील अवैध धंदे बंद होण्यासाठी माय, माऊलींचे देवाला साकडे
===========================================

वडगाव आंबे, वडगाव आंबे खुर्द व वडगाव आंबे बुद्रुक या गावातील अवैध धंदे बंद होण्यासाठी वारंवार अर्जफाटे करुन काही एक फायदा होत नसून पिंपळगाव हरेश्वर पोलीस अधून मधून येतात व कारवाई करतात परंतु पोलीस गेल्यानंतर लगेचच त्याच जागेवर त्या ठिकाणी त्याच तिकिटावर तोच खेळ सुरू होतो परंतु हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होत नसल्याने या अवैध धंदे करणारांना गाव, तांड्यातील स्वताला प्रतिष्ठित समजून घेणारे व काही जबाबदार व्यक्ती यांची पाठराखण करत असल्याचे बोलले जात आहे. म्हणून त्रस्त झालेल्या महिला वर्गाने सरतेशेवटी आता मकरसंक्रांतीच्या दिवशी थेट देवालाच साकडे घालून स्वताच्या मनाची समजूत करुन घेत सरतेशेवटी
“ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान” असे जीवन जगत आहेत.

ब्रेकिंग बातम्या