अंबे वडगाव येथे विवाह सोहळ्यात हिंदू, मुस्लिम एकतेचे दर्शन, मुस्लिम बांधवांच्या हातून हिंदू मुलीचे कन्यादान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०४/२०२२
(कृपया बातमी कॉपी पेस्ट करु नये)
मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना,
हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा
आजच्या परिस्थितीत सगळीकडे जातियवादी घटना घडत आहेत म्हणण्यापेक्षा स्वार्थी व विघ्नसंतोषी काही लोक घडवून आणत आहेत. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सर्वधर्मसमभाव पध्दतीने वागत व जगत आहोत. एकमेकांचे सण, उत्सवात, धार्मिक कार्यक्रम हिंदू, मुस्लिम बांधव एकोप्याने साजरे करत आहोत. यातुनच आजही हिंदू, मुस्लिम बांधवांचा भाईचारा टिकून आहे.
याचेच एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मुस्लिम बांधवांचे रमजान महिन्याचे उपवास (रोजे) सुरु असतांनाच रखरखत्या उन्हात दिवसभर अन्न, पाण्याचा त्याग करत स्वताचा उपवास (रोजा) असल्यावरही दिडशे किलोमीटर अंतराचा प्रवासाचा टप्पा पार करून एक मुस्लिम बांधव पत्नी, शालक व शालकाची पत्नी सोबत घेऊन आले व आपल्या हिंदूं समाजाच्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला येऊन सपत्नीक कन्यादान करुन आपल्या मित्रत्वाची जबाबदारी पार पाडल्याचा सुखद व डोळ्यांचे पारणे फेडणारा विधी पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे घडला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील मा. श्री. वाल्मिक सुकदेव वखरे (आदर्श फोटो स्टुडिओ शिंदाड बाळु भाऊ फोटोग्राफर) यांची जेष्ठ कन्या चि. सौ. का. प्रियांका हिचा विवाह पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील मा. श्री. भास्कर देवचंद शिंदे यांचे कनिष्ठ चिरंजीव विशाल यांचा विवाहसोहळा दिनांक १५ एप्रिल २०२२ सोमवार रोजी दुपारी एक वाजता अंबे वडगाव येथे संपन्न झाला. या विविध सोहळ्यात सकाळपासूनच एक मुस्लिम समाजबांधव आपला शालक, व पत्नीसोबत विवाह सोहळ्यात सामिल झाले होते. हा परिवार लग्नसोहळ्याला आलेला पाहून सगळेच कुतूहलाने त्यांच्याकडे पहात होते.
विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे विवाहाच्या इतर विधी संपन्न होत होत्या यात सगळ्यात महत्वाचा विधी म्हणजे कन्यादान, कन्यादान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे असे म्हटले जाते म्हणून की काय विवाह सोहळ्यात हा विधी मोठ्या थाटामाटात केला जातो यात वधूचे आईवडील यांनी लग्न सोहळ्यात हजारो नातेवाईक व सगेसोयरे यांच्या उपस्थितीत हा विधी पारंपरिक पध्दतीने पार पाडला.
या शिंदे व वखरे परिवाराच्या विवाह सोहळ्यात मुलीच्या आईवडिलांच्या हस्ते कन्यादान विधी पार पडला लगेचच या लग्नसोहळ्याला सकाळपासूनच हजार असलेले नाशिक जवळील पिंपळगाव (बसवंत) येथील भारतीय छप्परबंद मुस्लिम समाज सुधारक मंडळाचे नाशिक जिल्हाध्यक्ष, निफाड तालुका कॉंग्रेस (अल्पसंख्याक सेल) चे अध्यक्ष तसेच लोकहित पत्रकार संघ निफाडचे तालुकाध्यक्ष हाजी युनुस शमसुद्दीन शाह व त्यांच्या धर्मपत्नी परवीन यांच्या समवेत मा. श्री. वाल्मिक वखरे यांची कन्या चि. सौ. का. प्रियंका हिच्या कन्यादाचा विधी पार पाडण्यासाठी बसले. त्यांनी हिंदू संस्कृती प्रमाणे वधूवरांंचे पुजन करुन रितीरिवाजाप्रमाणे तांब्याचा हंडा, कळशी व पुजेसाठी लागणारा तांब्याचा मंगल कलश देऊन ब्राम्हणाच्या साक्षीने कन्यादान केले. कन्यादान विधी सुरु असतांनाच आपली मानसपुत्री कन्या आपल्यापासून दुर जाणार म्हणून हाजी युनुस भाई व त्यांच्या धर्मपत्नी परवीन ह्या भाऊक झाल्या होत्या याप्रसंगी परवीन ताई यांच्या डोळ्यातून अक्षरशा गंगा, जमुना वाहू लागल्याचे तसेच हिंदू मुलीचे कन्यादान मुस्लिम बांधव व भगिनी करत पाहून त्याच्यातील नात्याचा ओलावा पाहून मंडपातील वऱ्हाडी मंडळीचे डोळेही पाणावले होते.
लग्नमंडपात कन्यादानाचा हा विधी सुरु असतांना अंबे वडगाव गावातील व लग्न सोहळ्यात आलेले शेकडो वऱ्हाडी मंडळी भारावून गेले होते. हा अविस्मरणीय क्षण आपल्या आठवणीत रहावा म्हणून उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी क्षणाचाही विलंब न करता आपापल्या मोबाईलमध्ये या प्रसंगाची चित्रफीत तयार केली. एका हिंदू मित्राच्या मुलीच्या लग्नाला येऊन एक मुस्लिम बांधवाने सपत्नीक कन्यादान केल्याने या विवाहाची व कन्यादान विधीची कौतुकास्पद चर्चा पाचोरा तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात जोरदार सुरु असून मुस्लिम बांधव कन्यादान करतांनाची चित्रफीत सगळीकडे फिरत असून एक नवा आदर्श जनमानसात दिसून येते आहे.
याबाबत सत्यजित न्यूजच्या माध्यमातून हाजी युनुस शहा यांच्याशी संवाद साधून याबाबत सविस्तर चर्चा केली असता हाजी युनुस भाई यांनी आपल्या अतुट मैत्री बद्दल दिलखुलासपणे आपले मन मोकळे केले. मा. श्री. वाल्मिक वखरे व माझी फोटोग्राफीच्या माध्यमातून आमची ओळख झाली व येथूनच आमचे संबंध वाढत गेले व आज आमचे रक्ताच्या नात्या सारखे संबंध आहेत. आम्ही दोघ परिवार एकमेकांच्या सुखदुखात सामील असतो असे सांगत जर आपला हेतू निर्मळ, निस्वार्थी असला तर नाती जुडण्यासाठी वेळ लागत नाही. (प्रेम) हा अडीच अक्षरी शब्द असा आहे की यात जाती, धर्म, पंथ हे सगळं विसरून माणुस एकरूप होतो.
हिंदु, मुस्लिम सलोख्याचे वर्णन करतांना त्यांनी मार्मिक शब्दात उत्तर दिले.
(जैसे हमारे राष्ट्रीय ध्वजके रंगमे भगवे के साथ हरा है, वैसे ही हमारा भाईचारा है.)