कोल्हे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सेक्रेटरी विरोधात सदस्यांची तक्रार. निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०३/२०२२
सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात सगळ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूका लागल्या असून मागील महिन्यापासून याबाबत सहकार खात्याच्या नियमानुसार योग्य त्या पध्दतीने कामकाज सुरु आहे. मात्र या निवडणूक प्रक्रियेत पाचोरा तालुक्यातील कोल्हे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सेक्रेटरी यांनी सोसायटीच्या सभासदांना योग्य वेळात निवडणूक कार्यक्रमाची माहिती न करता मुद्दामहून सोसायटीच्या सभासदांना अंधारात ठेवून एकतर्फी मर्जीतील सभासदांना माहिती देत निवडणूक बिनविरोध करुन घेण्याचा घाट घातला असल्याचा आरोप करत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी एका निवेदनाद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोल्हे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर कार्यरत असलेले सेक्रेटरी मा.श्री. मदने यांनी कोणताही माहिती वेळेवर प्रकाशित केलेली नाही. नियमानुसार हा निवडणूक कार्यक्रम कालावधी ४५ दिवसाचा असून यात सुरवातीला सोसायटीच्या सभासदांची तात्पुरती यादी जाहीर करुन त्यात काही त्रुटी आढळून आल्यास किंवा सभासदांनी यादी बाबत आक्षेप घेतल्यास या सर्व बाबींचा निपटारा करुन अंतिम यादी जाहीर करणे गरजेचे असतांना संबंधित सेक्रेटरी यांनी अशी कोणतीही प्रोसेस केलेली नसल्याचे सभासदांनी सांगितले.
विशेष म्हणजे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गावातील चावडीवर सभासदांची तात्पुरती यादी व निवडणूक कार्यक्रम लावणे गरजेचे असतांना संबंधित सेक्रेटरी यांनी जाणूनबुजून ही प्रक्रिया करतांना उशीर करुन या याद्या व निवडणूक कार्यक्रमाचे प्रसिद्ध पत्रक हे अडगळीच्या ठिकाणी लावून सभासदाच्या व कोल्हे ग्रामस्थांच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.
तसेच निवडणुकीत उमेदवारी दाखल करणे, उमेदवारी अर्जाची छाननी करणे, माघार घेणे, या तारीखांची सविस्तर माहिती देणे क्रमप्राप्त असतांनाही तसे न करता अचानकपणे उमेदवारी दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या फक्त एक दिवस अगोदर मर्जीतील सभासदांना माहिती पुरवून दिनांक २२ मार्च २०२२ मंगळवार रोजी काही सभासदांचे उमेदवारी अर्ज भरुन झाल्यानंतर कोल्हे गावात जाहीर सुचना (दवंडी) देण्यात आल्यामुळे सर्व सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कारण ऐनवेळी दवंडी दिल्यामुळे काही सभासदांना उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते ते शक्य झाले नाही. या गैरप्रकारामुळे सोसायटीच्या सभासदांनी तिव्र संताप व्यक्त करत सेक्रेटरी मदने यांच्या कामकाजावर आक्षेप घेत, संबंधित सेक्रेटरी हे गावातील काही सभासदांना पाठीशी घालून फितूर होऊन गावात गटबाजी करुन अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप इतर सभासदांनी केला आहे.
कारण निवडणूक कार्यकाळात व निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला असल्याने इच्छुक असलेल्या सभासदांना वेळेत उमेदवारी अर्ज दाखल न करता कोल्हे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, व पून्हा नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन निवडणूक घेण्यात यावी तसेच संबंधित सेक्रेटरी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सभासदांनी केली असून असे न झाल्यास आमचा निवडणूकीवर बहिष्कार असेल असे जाहीर केले आहे.