अंबे वडगाव ग्रामपंचायत कर वसुलीसाठी, थकबाकीदारांच्या घरासमोर वाजवणार डंका.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी अजब आणि गजब शक्कल लढवली असून, यात ज्या ग्रामस्थांकडे ग्रामपंचायतीची थकबाकी असेल त्यांना जागे करण्यासाठी त्यांच्या घरासमोर दररोज काहीवेळ डफ वाजवण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निवासी ग्रामस्थांकडे ग्रामपंचायतीचे घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर वर्षानुवर्षा पासून थकबाकी आहे. ग्रामस्थांना वारंवार तोंडी व लेखी स्वरुपात सुचना (नोटीस) देऊनही ग्रामस्थ ग्रामपंचायतीचा कर भरत नसल्याने ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आली आहे.
या कारणांमुळे ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन तसेच विद्यूत बिल थकित झाले आहे. तसेच गावातील विविध समस्या सोडवणे व विविध विकासकामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. ग्रामस्थांना वारंवार सांगुनही ग्रामस्थ कर भरत नसल्यामुळे थकबाकीदार ग्रामस्थांना जागे करण्यासाठी सरतेशेवटी आज दिनांक १६ डिसेंबर गुरुवारी डफ वाजवून जाहीर निवेदन (दवंडी) देण्यात आली आहे.
आजपासून आठ दिवसाच्या आत जे ग्रामस्थ आपल्याकडे असलेला ग्रामपंचायतीचा थकबाकी कर भरणार नाहीत. त्यांच्या घरासमोर दररोज डफ वाजवला जाईल असे दवंडी देऊन जाहीर करण्यात आले आहे. या अजब, गजब प्रकाराने थकबाकीदार धास्तावले असून बरेचसे थकबाकीदार कर भरण्यासाठी धडपड करत आहेत.