दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१०/२०२२

पाचोरा तालुक्यातील कळमसरा, म्हसास, लोहारा, कुऱ्हाड, कोकडी तांडा परिसरातील राखीव जंगलासह शेती शिवारात मागील एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून गावागावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील, खळ्यातील तसेच शेती शिवारात चरण्यासाठी गेलेल्या शेळ्या, गायी, म्हशींवर हल्ला चढवून आजपर्यंत बऱ्याचशा पाळीव जनावरांचा फडशा पाडला आहे. यात दोन दिवसापूर्वीच बिबट्याने अनिल शंकर धनगर यांच्या मालकीच्या अंदाजे विस हजार रुपये किंमतीच्या गोऱ्हावर हल्ला चढवून ठार केल्यामुळे शेतकऱ्याचे विस हजार रुपये नुकसानभरपाई वनविभागाने त्वरित द्यावी अशी मागणी केली जात असून या वनविभागाचे कर्मचारी मा. सुर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट घेऊन रितसर पंचनामा केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

याबाबत पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना वारंवार कळल्यावर ही संबंधित अधिकारी व कर्मचारी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कारण वरील गावातील शेती शिवारात दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर असून आजपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांना व शेतमजूरांना बिबट्या दिसून येत असल्याने या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

यामुळे शेतमजूर शेतात जाण्यासाठी धजावत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील मका, सोयाबीन काढण्यासाठी तसेच कापूस वेचणी, फवारणी, कोळपणी, निंदनी व हिवाळी पिके घेण्यासाठी जमीनीची मशागत करणे अवघड झाले आहे. म्हणून वनविभागाने पिंजरा लाऊन या शिवारातील बिबट्याला पकडून दुसरीकडे सोडावे अशी मागणी केली आहे.