पुरहाणी पासून बचावासाठी पन्नास लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या गटारीचा पैसा जाणार पाण्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०२/२०२२
पावसाळ्यात येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा पुर येऊन या पाण्यापासून अंबे वडगाव परिसरातील नागरिकांना त्रास होऊन कोणताही हाणी होऊनये म्हणून पाणी वाहून जाण्यासाठी अंबे वडगाव येथे जामनेर ते पाचोरा रस्त्यावर दुतर्फा गटारीचे काम सुरु आहे. परंतु या गटारीचे मंजुरीपासून तर थेट कामाला सुरुवात करण्यापर्यंत ग्रामपंचायतीच्या योग्य मागणीकडे व ग्रामस्थांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत पाचोरा तालुक्याचे आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी या गटारीच्या कामासाठी पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच स्वता आमदार साहेब या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आले होते परंतु या गटारीच्या बांधकामासाठी गावातील सुज्ञ लोकांनी हरकत घेतल्यामुळे आमदार साहेब या कामाचा शुभारंभ न करताच परत गेल्याचे खात्रीपूर्वक समजते.
असे असल्यावरही बांधकाम विभाग पाचोरा व संबंधित ठेकेदाराने मागील तीन दिवसापासून या कामाला सुरुवात केली आहे. परंतु या गटारीचे काम ठरवून दिलेल्या निविदेप्रमाणे होत नसल्याचे तसेच ही चारी बांधल्यावरही पुराचे पाणी वाहून जाऊच शकत नाही असे ग्रामस्थाचे म्हणणे असून हे काम त्वरीत थांबवण्यात यावे अशी मागणी होत आहे.
कारण या गटारीचे बांधकाम करतांना हे काम रस्त्याच्या मध्यभागापासून पाच मिटर अंतरावर पाहिजे परंतु प्रत्यक्षात अंतर कमी आहे. या कारणामुळे पाचोरा ते जामनेर रस्त्याचे भविष्यात रुंदिकरणासाठी चे काम प्रस्तावित आहे म्हणून जेव्हाही या रस्त्याच्या रुंदिकरणासाठी काम सुरु होईल तेव्हा मात्र ही बनवलेली चारी या रस्त्याच्या रुंदिकरणाचे कामात दाबली जाऊन त्याठिकाणी कॉंक्रिटीकरण केले जाईल म्हणजेच भविष्य हे पन्नास लाख रुपये पाण्यात जातील यात तिळमात्र शंका नाही. म्हणून हे मनमानी पध्दतीने होणारे काम त्वरित थांबवून ते निविदेप्रमाणे व्हावे अशी मागणी होत आहे. तर काही ग्रामस्थांचा या कामाला विरोध असून या पाण्याची विल्हेवाट पूर्वीप्रमाणेच लावण्यात यावी अशी मागणी केली असून असे न झाल्यास ते आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
[यामागील कारण व सविस्तर माहिती पुढील प्रमाणे]
पाचोरा ते जामनेर राज्य महामार्ग १९ या रस्त्यावर अंबे वडगाव येथील बसस्थानकापासून थोड्याच अंतरावर तसेच महानुभाव पंथाचे आश्रम पासून गावाकडील रस्त्यावर ब्रिटिश काळापासून शेतशिवारातील तसेच गावातील पाणी वाहून जाण्यासाठी एक छोटीशी मोरी होती. परंतु ही मोरी काही कारणास्तव निकामी झाली तसेच अंबे वडगाव येथील काही ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत अतिक्रमण करून या मोरीच्या दोघ बाजूने माती, मुरुमाचा भराव केल्यामुळे पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे.
ही समस्या निर्माण झाल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी या पूल वजा मोरीतून वाहून जात नसल्याने येथे मोठा तलाव साचतो यामुळे इंदिरानगर भागातील रहिवासी तसेच काही शेतकऱ्यांना या साचलेल्या पाण्याचा उपद्रव होतो. तसेच याच साचलेल्या पाण्याच्या डबक्यात साप व इतर विषारी प्राणी येऊन राहतात म्हणून या मोरीचे काम पूर्ववत होऊन हे पाणी काढून देण्यात यावे अशी मागणी अंबे वडगाव ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती.
या मागणीनुसार ब्रिटिशकालीन असलेली मोरी कायमस्वरूपी बनवून ही समस्या सोडवणे गरजेचे असतांंना गावातील काही झारीतले शुक्राचार्य यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकाऱ्याला हातचे धरून आर्थिक देवाण-घेवाण करून तसेच पाचोरा भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांना भूलथापा देऊन आमदार साहेबांच्या डोळ्यात धूळफेक करून ही ब्रिटिशकालीन मोरी न बनवता रस्त्याच्या दुतर्फा सांडपाण्याची चारी तयार करून मिळावी अशी मागणी केली होती.
ही मागणी केल्यानंतर आमदार साहेबांनी कोणतीही शहानिशा न करता उदार मनाने या पाण्याचा निचरा होण्यासाठी विशेष प्रयत्न करुन वरखेडी राज्य मार्ग १९ कि.मी १९७/६०० ची पुरहाणी दुरुस्ती करण्यासाठी अंदाजीत किंमत रु. ४.५९६.७६१.०० चा निधी उपलब्ध करुन देत मागील आठवड्यात स्वता येऊन या कामाचा शुभारंभ करण्यासाठी श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यासाठी आले होते मात्र ग्रामस्थांनी ही गटार बनवण्यासाठी आक्षेप घेतल्याने आमदार साहेबांनी संबंधित कामाच्या शुभारंभाचा निर्णय मागे घेत उदघाटन न करताच परत गेल्याचे समजते.
परंतु रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहून जाण्यासाठी ही चारी बनवल्यास अंबे वडगावकरांच्या नशीब अनेक समस्या उद्भवणार असून यात महत्त्वाची समस्या म्हणजे अंबे वडगाव बस स्थानक, मराठी मुलांची शाळा, बसस्थानक परिसरात वर्षानुवर्षापासून असलेले वडाचे झाड व
त्या झाडाच्या बुंध्याजवळ बांधलेला ओटा म्हणजे (अंबे वडगाडगावकरांची चावडी) या महत्त्वाच्या भागात गटारगंगा निर्माण होणार आहे हे मात्र निश्चित.
तसेच या गटारीमुळे अंबे वडगाव गावातील इंदिरानगर भागाकडून येणारे दोन रस्ते, डॉ. शामकांत पाटील यांच्या घराकडून येणारा एक रस्ता, विविध कार्यकारी सोसायटी कडून येणारा एक रस्ता तसेच महत्त्वाचे म्हणजे पाचोरा ते जामनेर रस्त्यालगत जगदीश वाघ यांच्या घरापासून तर पुढे अशोक गायकवाड यांच्या घरासमोरुन गावात ट्रक, ट्रॅक्टर व आणिबाणीच्या वेळेस गावात जाण्यासाठीचा एकमेव रस्ता या रस्त्यावर रहदारीला मोठ्या अडथळा निर्माण होणार आहे. तर दुसरीकडे जिल्हापरिषद मराठी मुलांची शाळा, बसस्थानक व महिलांच्या शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांची वाट लागणार आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर अंबे वडगाव हे गाव ढाप्यांचे व गटारगंगेचे गाव म्हणून ओळख निर्माण होईल यात तिळमात्र शंका नाही.
विशेष म्हणजे ब्रिटिश कालीन असलेल्या लहान पुलवजा मोरीचे बांधकाम पुर्ववत करुन ही समस्या सोडवणे गरजेचे असतांनाच कुणीतरी स्वतःच्या फायद्यासाठी आमदार साहेब व सार्वजनिक बांधकाम विभागाला खोटी माहिती देऊन पाचोरा ते जामनेर रस्त्याच्या दोघ बाजुने चारी बनवण्यासाठी घाट घातला आहे. व आमदार साहेब व सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वता पहाणी न करताच व अंबे वडगावच्या या परिसरातील भौगोलिक अभ्यास न करताच धृतराष्ट्रासारखी डोळ्यावर पट्टी बांधून मंजूर दिली आहे.
मात्र या कामाला अंबे वडगाव ग्रामस्थांचा तिव्र विरोध असून या गटारीच्या कामाला सुरवात झाल्यास अंबे वडगाव ग्रामस्थ आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. म्हणून गावातील भौगोलिक परिस्थिती जाणून घेत ब्रिटिशकालीन असलेली पाण्याची मोरी पूर्ववत बांधकाम करून नकाशावर असलेली पाण्याची चारी पूर्ववत बांधून द्यावी अशी मागणी होत आहे.