सार्वे शिवारातील गायरान जमिनीवर अवैध उत्खनन चौकशीची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील सार्वे, जामने हे दोघे गाव मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील जामने शिवारात १६४ एकर गायरान जमीन असून या गायरान जमिनीवर मागील काही वर्षापासून मोठ्याप्रमाणात विनापरवाना अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे. या उत्खननाबाबत स्थानिक पातळीपासून तर थेट मंत्रालयापर्यंत वारंवार तक्रारी करून सुद्धा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही व झालेली नाही.
या कारणांमुळे, सार्वे, जामने, तसेच आसपासच्या आठ ते दहा खेड्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण या गायरान जमिनीवर वरखेडी, सावखेडा, भोकरी, अंबे वडगाव, अंबे वडगाव बुद्रुक तांडा नंबर १, अंबे वडगाव तांडा नंबर २, लोहारी, कुऱ्हाड खुर्द, कुराड बुद्रुक, सर्वे, जामने, या गावातील पाळीव व दुधाळ जनावरांना चरण्यासाठी एकमेव गायरान जमीन होती. परंतु गायरान जमिनीवर काही गौणखणीज माफियांनी अनाधिकृतपणे ताब मिळवून मोठ्या प्रमाणात उत्खनन करुन गायरान जमिनीची चाळणी करुन टाकली आहे.
या गायरान जमिनीवर झालेल्या अनाधिकृत, विनापरवाना उत्खननामुळे वरील सात ते आठ गावातील पशुधन पालकांना आपले पशुधन चारण्यासाठी असलेले कुरण नष्ट झाल्यामुळे आपली चांगल्या जातीची शेतीपयोगी तसेच दुधाळ जनावरे विकावी लागली तसेच या गायरान जमिनीवरील झाडे, झुडपे व इतर निसर्गसंपदा नष्ट झाल्याने पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला असल्याने पंचक्रोशीतील निसर्गप्रेमी व जनतेतून संतप्त भावना व्यक्त केल्या जात असून या अनाधिकृत उत्खननाची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
अशीच चौकशीची मागणी सार्वे, जामने गावचे उपसरपंच मा.श्री. गजानन भानुदास पाटील यांनी केली असून यांच्या मते जामने शिवारातील गायरान क्षेत्रात अवैध उत्खलनाबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा आतापर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी ग्रुप ग्रामपंचायत सार्वे ब्रु. प्र. लो. यांच्या तक्रारींची दाखल घेऊन योग्य ती करण्यासाठी जामने शिवारात होत असलेल्या गायरान क्षेत्रात अवैध उत्खलन थांबून कायदेशीर कारवाई करण्या बाबत मागणी केली असून या बाबत मा.जिल्हाधिकारी साहेब जळगाव, मा.प्रांताधिकारी साहेब पाचोरा व मा.तहसीलदार साहेब पाचोरा यांच्या कडे तक्रारी अर्ज देऊन केली आहे.
(परंतु ज्या ठिकाणी सद्यस्थितीत उत्खनन सुरु आहे व ज्या क्षेत्रातील उत्खननाबाबत उपसरपंच यांनी तक्रार केली आहे. तो गट नंबर एका शेतकऱ्याच्या मालकीचा असून त्या गट नंबरचा व गायरान जमिनीचा काहीएक सबंध नसल्याचे संबंधित शेतमालकाचे म्हणणे असून तक्रारदाराने रितसर मोजणी करुन आपला होणारा गैरसमज दुर करुन घ्यावा असे शेतमालकाचे मत आहे.)