अंबे वडगाव शिवारात अत्यावस्थ अवस्थेत आढळलेला मोर वनविभागाच्या ताब्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०१/२०२२
अंबे वडगाव येथील शेतकरी अरुण बाबुराव पवार यांच्या शेतात आज दुपारी अत्यवस्थ (आजारी) परिस्थितीत मोर आढळून आला. पवार यांना शेतात मोर दिसला म्हणून ते लांबूनच पहात होते. परंतु बराचवेळ झाला तरी मोराची हालचाल दिसून आली नाही, म्हणून त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता मोर बेशुद्ध होता. त्याला हात लावून पाहिले असता त्याला चालता, फिरता येत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी त्याला अलगद उचलून पाणी पाजण्याचा प्रयत्न केले मात्र परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात येताच त्यांनी पाचोरा वनविभागाशी संपर्क साधून मोराबाबत माहिती दिली.
तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला परंतु आज २६ जानेवारीची सुट्टी असल्याकारणाने ते बाहेरगावी होते, म्हणून उपलब्ध होऊ शकले नाही. परंतु वरखेडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील एक कर्मचाऱ्याला पाठवून उपचार करण्यात आले. नंतर त्या मोराला वनविभागाने ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी पाचोरा घेऊन गेले असून त्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहेत.
(अरुण पवार~मोराला वाचवण्यासाठी वनविभागाने चांगले उपचार व काळजी घ्यावी शक्य होत नसल्यास आम्हाला सांगावे उपचारासाठी लागेल तेवढा खर्च मी देण्यासाठी तयार आहे. कारण बरेचसे प्राणी, पक्षी दुर्मिळ झाले असून आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याकारणाने भावी पिढीला या प्राणी, पक्षांची ओळख करुन देण्यासाठी फक्त चित्रे दाखवून ओळख करुन द्यावी लागेल का अशी भिती व्यक्त केली आहे.)
तर दुसरीकडे वनविभागाचे गलथान कारभाराबाबत निसर्गप्रेमी व पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण पाचोरा व जामनेर तालुक्याल्या मोठ्या प्रमाणात वनविभागाची नैसर्गिक देणगी मिळालेली आहे. जामनेर व पाचोरा तालुक्यात मोठमोठी राखीव जंगले आहेत. परंतु या राखीव जंगलाचे देखभालीसाठी जे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आहे आहेत हे मात्र उंटावरून शेळ्या चारत असल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे.
पाचोरा व जामनेर तालुक्यातील वनीकरण विभाग व राखीव जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याकारणाने या जंगलात माणसांची वर्दळ वाढली असल्याने जंगलात वन्यप्राणी घाबरून सैरावैरा जंगलाचे बाहेर पळत असल्याने त्यांची शिकार होत आहे. विशेष करुन रानडुकरांची शिकार करून त्यांचे मास विकणाऱ्या काही टोळ्या सक्रिय झाल्या असून सोबतच निलगायींचीही शिकार होत असल्याचे गावागावातील जनमानसात चर्चीले जात आहे. तसेच या शिकारींना काही शेतकरी मदत करत आहेत. कारण राखीव जंगलाला सरंक्षण जाळ्या व सीमारेषेवर खोदण्यात आलेल्या चाऱ्या (सीमारेषा) बुजल्याने जंगली प्राणी जंगलाबाहेर शेत शिवारात येऊन शेतीमालाचे नुकसान करत आहेत. तसेच राखीव जंगलातील काही भागातून गौणखणीजाची चोरी होत आहे.
तर दुसरीकडे शेतशिवारातील स्वमालकीची तसेच तहसील हद्दीतील म्हणजे नद्या, नाले यांच्या काठावरील हिरव्यागार वृक्षांची कोणतीही परवानगी न घेता बेसुमार कत्तल सुरू आहे. याबाबत वारंवार आवाज उठल्यावर सुद्धा वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने निसर्गप्रेमी कडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. तरी या निसर्गाच्या होणाऱ्या नुकसानीकडे व जंगली प्राण्यांच्या शिकारी थांबवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी, प्रांत साहेब, व तहसीलदार तसेच जिल्हा व तालुक्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असून वनविभागाची कान उघडणे करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास झपाट्याने निसर्गसंपत्ती सह वन्य प्राणी व पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होऊन निसर्गाचा समतोल ढासळेल यात मात्र शंका नाही.