अज्ञात वाहनाच्या धडकेत कुऱ्हाड येथील मजूर जागीच ठार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१२/२०२१
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तालुक्यातील कुऱ्हाड येथील मजूर जागीच ठार झाल्याची घटना काल सायंकाळी घडली.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कुऱ्हाड खुर्द येथील हात मजूर सुरेश गणपत देशमुख (वय – ४०) हे गेल्या तीन वर्षांपासून पाचोरा येथील एका व्यापाऱ्याकडे शेती कामासाठी परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने येण्या, जाण्यासाठीचे भाडे वाचवण्यासाठी सायकलवर ये – जा करत होता. रविवारी सायंकाळी ६:३० वाजता त्यांची सुट्टी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सायकलवरून घरी जाणेसाठी निघाला होता.
दरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान बिल्दी धरणावरुन जात असतांना जळगाव कडुन एक अज्ञात चारचाकी वाहन भरधाव वेगाने येवुन त्यांचेवर समोरुन येवुन धडकले. दरम्यान देशमुख यास धडक बसल्याने अज्ञात वाहनाच्या पुढील चाकाखाली आल्याने त्यांचे जागीच निधन झाले.
दरम्यान गावातीलच माजी ग्रामपंचायत सदस्य विलास चव्हाण हे पाचोरा येथून घरी जात असतांना त्यांना एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. म्हणून त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता सदर व्यक्ती कुऱ्याडचाच असल्याने जखमी सुरेश देशमुख यांना ओळखले. ओळख पटतच विलास चव्हाण यांनी तात्काळ शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा.श्री. अरुण भाऊ पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे सदरची घटना कळवली.
माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता अरुण भाऊ पाटील यांनी पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष कर्मचारी राहुल बेहरे यांना माहिती दिली. बेहरे यांनी तात्काळ रुग्णवाहिकेसोबत जावुन मयताचे शव ग्रामीण रुग्णालयात आणले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी कुऱ्हाड गावासह पंचक्रोशीतील गावात पोहचली. ही दुखद वार्ता कळताच गावपरिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले. व ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी पाचोरा रूग्णालयात धाव घेतली.
मयत सुरेश देशमुख यांच्या भाऊबंदकीत आज लग्न सोहळा आहे. या आनंदाचे क्षणीच हा अपघात झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत सुरेश देशमुख यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन लहान मुले, दोन भाऊ, एक बहिण असुन मयत देशमुख यांचेवर राहतेगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
(भाऊबंदकी मध्ये लग्न असल्याने हा विवाह सोहळा कोणताही बडेजाव न करता फक्त ठरलेल्या तिथीप्रमाणे साध्या पध्दतीने होणार असून विवाह सोहळा आटोपल्यानंतर अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे समजते.)