ऐनवेळी विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ. रमेशजी बाफना.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०४/२०२१
(हाती, तोंडी आलेला घास हिरावून घेतला)
मार्च महिन्याच्या शेवटी व एप्रिल महिन्याच्या सुरवातीला म्हणजे नुकतेच उन्हाळी पीक हाती येण्याचा कालावधी असतांनाच विद्युत वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला या कारणास्तव शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक फक्त शेवटच्या दोन पाण्याअभावी हातचे जाणार असल्याने शेतकऱ्यांना लागलेला खर्च न निघाल्यास आत्महत्येची वेळ आली असल्याचे मत कोल्हे येथील आदर्श शेतकरी रमेशजी बाफना यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत वेळी रमेशजी बाफना यांनी बोलतांना सांगितले की मागील वर्षापासून कोरोनाचा ससेमिरा मागे लागलेले असतांनाच शेतकरी मेटाकुटीस आला आहे. याचे कारण म्हणजे शेतकऱ्याने निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत करत जेमतेम पीक कमावले परंतु शेतकऱ्यांच्या मालाला कोणताही हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी पोटी हाती आलेला सोन्यासारखा शेतीमाल मातीमोल भावात विकावा लागला. एवढे करूनही शेतकरी अडचणीत असतांना त्याने इकडून तिकडून उचल, पटक करुन हिवाळी व उन्हाळी पीक घेऊन झालेलं नुकसान भरून काढू हे स्वप्न उराशी बाळगून कंबर कसली परंतु निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देत देत शेवटी पिके हाती आली असतांनाच मागील आठवड्यात झालेला वादळी पाऊस आल्याने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतांना कोल्हे येथील माजी सरपंच व आदर्श शेतकरी श्री. रमेशचंद्रजी बाफना.
या वादळी पावसात शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळेल अशी अपेक्षा होती परंतु तसे झाले नाही.
त्यातच विद्यूत वितरण कंपनीने विजेचे बिल भरा असा फतवा काढला विविध सवलती जाहीर केल्या शेतकरी थोडेफार विज बिल भरण्यासाठी तयारी करत असतांनाच सत्ताधारी व विरोधी सरकारचे विज बिलावरुन कलगीतुऱ्याचे राजकारण सुरु झाले. यातच शेतकरी व्दिधा मनस्थितीत सापडला बिल भरायचे की नाही या विचारात असतांनाच भरीत भर म्हणून विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे शेतातील ज्वारी, दादर, मका, भुईमूग, उडीद, मूग, तसेच गिलके, दोडके, वांगी, गड्डा गोबी, फुलगोबी, टमाटे, गवार, चवळी, मेथी, कोथंबीर हा भाजीपालाही हाती येत असतांनाच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने व वातावरणातील जास्त उष्णतामान असल्याने ही पिके निव्वळ शेवटच्या दोन पाण्यामुळे मातीमोल होणार आहेत. तसेच आठवडे बाजार बंद असल्याने आहे तो भाजीपाला मातीमोल भावात विकावा लागत असल्याने नसून नितात व असून संताप अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकरी जिवापाड मेहनत करून रात्रंदिवस राबराब राबतो व भविष्यातील स्वप्ने रंगवत असतो परंतु ऐनवेळी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा व शेतकऱ्याच्या परिस्थितीचा कोणताही आढावा न घेता थेट विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतातील उभे असलेले शेतकऱ्यांचे पीक उन्हामुळे वाळत आहे. जर येत्या आठवड्यात म्हणजेच या दोन चार दिवसात शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा न मिळाल्यास सगळेच पीक हातचे जाण्याची भीती आहे. म्हणून शेतकऱ्याचा हाती आलेला शेतमाल मातीमोल होऊन शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले महागडे बि, बियाणे, खते, निंदणी, खुरपणी, कोळपणी व शेतीमशागतीला लागलेला खर्च सुध्दा हातात येणार नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत कोल्हे येथील आदर्श शेतकरी रमेशजी बाफना यांनी शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त केले आहे.
तसेच आता नद्या, नाले आटल्यामुळे गुराढोरांना जंगलात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. म्हणून गावपरिसरात गुरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता काही शेतकरी बांधवांनी, काही समाजसेवकांनी तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाण्याचे हौद (हाळ) बांधले आहेत. परंतु विद्यूत पुरवठा खंडित झाल्यामुळे इतक्या पाळीव जनावरांना हाताने पाणी काढून पाणी पाजावे लागते आहे. तसेच भर दुपारी तहानलेली जनावरे पाणी पिण्यासाठी भटकंती करत असतात तसेच कोल्हे येथील श्री. महावीर गोशाळेत साठ ते सत्तर गायी असून या गायींचेही पाण्याअभावी हाल होत आहेत.
तरी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय ऊर्जामंत्री, यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव करून लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरू करून द्यावा म्हणजे शेतकऱ्याच्या हाती आलेले पीक वाया जाणार नाही व शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारणार नाही. तसेच आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वीजबिल भरलेली आहेत अजूनही बरेचसे शेतकरी वीजबिल भरण्यासाठी तयार आहेत. परंतु आम्हाला लवकरात लवकर विद्यूत पुरवठा सुरु करुन जीवदान दिल्यास नक्कीच आम्ही उर्वरित बिल भरुन थकबाकी पुर्ण करु असे सांगितले. असून शासन व प्रशासन लवकरच आमच्या भावनांना विचार करुन आम्हाला समजून घेईल अशी अपेक्षा व्यक्त केले आहे.