मुकादमाने काढला पळ, शिंदाड येथील ऊसतोड कामगारांची भाकरीसाठी तारांबळ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील जवळपास वीस मजूर ऊसतोडी साठी माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना गंगामाईनगर कारखान्यात ऊसतोडीचे काम करण्यासाठी दोन महिन्यापूर्वी गेले आहेत. परंतु या मजुरांना वेळेवर मजुरी मिळत नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली असून रिकाम्या पोटी काम होत नसल्याने काम करून घेण्यासाठी या मजुरांचा छळ केला जात असल्याचा व्हिडीओ संकटात सापडलेल्या मजूरांनी बनवून पाठवला असून आमची येथून सुटका करावी याकरिता गावाकडील नातेवाईकांना मदत मागितली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शिंदाड येथील भिल्ल समाजाचे मजूर दरवर्षी ऊसतोड करण्यासाठी कारखान्यावर जातात. या वर्षीही ऊसतोड कामासाठी जाणार असल्याने या मजुरांना नागद येथील एका जाधव नामक मुकादमाने संपर्क साधून आमच्याकडे ऊसतोडीसाठी यावे यासाठी गळ घातली. मजुरांना हाताला काम पाहिजे होते म्हणून त्यांनी नागद येथील मुकादमाला होकार भरला व या मुकादमाने या मजुरांना थोडीफार रक्कम देऊन ऊस तोडी करण्यासाठी करार नक्की केला.
नंतर या मजूरांना दोन महिन्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील या कारखान्यावर कामासाठी पाठवले. तुम्ही पुढे जाऊन कामाला लागा मी नंतर येतो असे सांगितले. परंतु मजूर कारखान्यावर गेल्यापासून या मुकादमाने कारखान्यावर हजेरी लावली नसून मजुरांच्या रहाण्याची व खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. तसेच मुकादमाने दिलेला थोडाफार उचल प्रवासात खर्च झाल्याने आजच्या परिस्थितीत मजूर जवळ हातात पैसा शिल्लक नाही. तसेच कारखान्यावर ऊस तोडीचे काम करून सुद्धा कारखानदारांकडून पैसे मिळत नसल्याने या मजुरांना खाण्यापिण्याचे हाल होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
कारखानदार पैसे देत नसल्याचे कारण विचारले असता संबंधित मुकादमाने कारखान्याच्या मालकाकडून चाळीस लाख रुपये उचल घेतला आहे. त्यापोटी त्यांनी बोटावर मोजण्याइतकेच मजूर ऊसतोडीच्या कामगाराला पाठवले आहे. परंतु या मुकादमाने या पैशाची अफरातफर करून पळ काढला असल्याने व तो कारखान्यावर हजर होत नसल्याने संबंधित कारखानदार या मजुरांना गुलामा सारखी वागणूक देत असून काम न केल्यास कंबरडे मोडण्याची धमकी देत आहे. तसेच रात्री, अपरात्री मजूर झोपले असतांना झोपड्यांमध्ये येऊन मजूर आहे किंवा नाही याची खात्री करत असल्याने महिलांना भीती वाटते तसेच केलेल्या कामाचे दाम देत नसून तुमच्या मुकादमाला घेऊन या तरच पैसे मिळतील अशी अट घालत आहे.
यामुळे ऊस तोड कामगार हतबल झाले असून मुलाबाळांसह थंडीत उघड्यावर राहून उपासमार सहन करत आहे. तरी संबंधितांनी तसेच कारखानदारांकडून होत असलेला छळ व मुकादमाने केलेली फसवणूक याबाबत या मजुरांनी टेंभुर्णी येथील पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. परंतु संबंधित पोलीस स्टेशन कडून या मजुरांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने आज हे मजूर मेटाकुटीला आले आहेत.