माणूसकीला काळीमा फासणारी घटना, निपाणे गावात स्मशानभूमीतही जातीयवाद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील निपाणे येथे एका महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत मज्जाव करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील निपाणे गावातील एका वृद्ध महिलेचे दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी वृध्दपकाळाणे दुखद निधन झाले होते. दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या पार्थिवावर अंतिम संस्कार निपाणे गावातच जिल्हा परिषदेने बांधलेल्या स्मशानभूमीत करण्याचे नियोजन करुन दिनांक १२ सप्टेंबर २०२२ सोमवार रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास त्या महिलेचे पार्थिव घेऊन नातलग मंडळी स्मशानभूमीत पोहचले होते.
परंतु या स्मशानभूमीत दुसऱ्या समाजाच्या लोकांनी येऊन ही स्मशानभूमी आमच्या समाजाची असून तुम्हाला अंत्यसंस्कार करायचे असतील तर आमच्या स्मशानभूमी बाहेर करा असे सांगितले तेव्हा मयत महिलेच्या नातेवाईकांनी संबंधितांना समजवण्यासाठी प्रयत्न केला मात्र दुसऱ्या समाजाच्या लोकांनी काहीएक ऐकून न घेता त्यांना धमकावले व धक्काबुक्की करत बाहेर काढून दिल्यामुळे संबंधितांना नाविलाजास्तव स्मशानभूमीत बाहेर उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागल्याची घटना घडली आहे.
निपाणे गावासाठी जिल्हापरिषदे मार्फत बांधण्यात आलेली स्मशानभूमी ही कुण्या एका समाजासाठी बांधण्यात आलेली नसून ती सर्व समाजासाठी आहे व असते यामुळे स्मशानभूमीत कोणत्याही समाजाला सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी मज्जाव करता येत नाही. परंतु आम्ही मागासवर्गीय असल्याने आम्हाला या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी सज्जाव केला असल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला असून या प्रकरणी त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला येऊन रितसर फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला इसम नामे १) मनोहर गिरीधर पाटील, २) रोशन धनराज पाटील, ३)राजेंद्र विश्राम पाटील ४) त्रंबक हिलाल पाटील ५) मयुर राजेंद्र पाटील ६) गोकुळ सुरेश पाटील ७) निलेश नथ्थु पाटील ८) शांताराम राजधर पाटील ९) भैया बालू पाटील, १०) अजाबराव ज्ञानेश्वर पाटील ११) वैभव राजेंद्र पाटील सर्व रा. निपाणे ता.पाचोरा जि. जळगाव या ११ जणांच्या विरोधात भादवी कलम भारतीय दंड संहिता १८६० च्या १४३, १४७, २९७,३२३, ५०४, ५०६ व अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ३ (१) (आर), अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती ३ (१) (एस),(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९,अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९३(१) (५), अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती ३ (१) (झेड), अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९,अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ३(२) (व्हिए) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.