एस.टी. सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पायपीट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१२/२०२१
नुकतेच एक तारखेपासून शाळा सुरू झाली असून तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थीवर्ग शाळेकडे वळाला आहे. परंतु एस.टी. सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जवळपास दहा किलोमीटर पर्यंत पायी प्रवास करावा लागत आहे.
यात विशेष म्हणजे काही खेडेगावातून शाळेत जाण्यासाठी जंगल परिसरातून रस्ता मार्गक्रमण करावा लागत असल्याने विशेष करुन ही बाब मुलींसाठी घातक ठरत आहे. तसेच काही रस्त्यांची परिस्थिती खराब असल्याने या रस्त्यावरून पायी चालणे मुश्कील झाले आहे. रस्त्यावरून चालतांना समोरून येणाऱ्या भरधाव वाहनांचा सामना करावा लागत आहे. तसेच काही विद्यार्थी खाजगी वाहनातून जीवघेणा प्रवास करत आहेत. यामुळे गोरगरिबांच्या मुलांना आर्थिक झळ बसत आहे.
आताच दोन दिवसापूर्वी भोजे व चिंचपूरा या गावातील शालेय विद्यार्थी पिंपळगाव हरेश्वर येथे दुचाकीवरून जात असतांना भिषण अपघात होऊन या अपघातात दोन विद्यार्थ्यांना आपल्या जीव गमवावा लागला असून दोन विद्यार्थ्यांवर अपंगत्व ओढवले आहे. तसेच रस्त्यावरून जातांना सगळीकडे हिरवळ असल्यामुळे जंगली श्वापदे व विषारी कीटकांपासून भीती निर्माण झाली आहे.
या सर्व बाबींमुळे विद्यार्थी व पालकवर्ग चिंतीत झाला असून बरेचसे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नसल्याचे दिसून येते. म्हणून शासनाने त्वरित तोडगा काढून एस.टी.बसेस उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे.