दोन सजेवर तलाठी एक, गावे अकरा,अत्यावश्यक कागदपत्रांसाठी शेतकरी मारतोय चकरा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील वडगाव अंबे सजेवरील म्हणजे वडगाव अंबे तलाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या तलाठी आप्पांची मागील चार महिन्यापूर्वी बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर नवीन तलाठी आप्पांची स्वतंत्र नेमणूक करणे गरजेचे असतांनाच नवीन तलाठी यांची नेमणूक न करता या रिक्त जागेवर वरखेडी सजेवर म्हणजे वरखेडी तलाठी कार्यालयात कार्यरत असलेले मा.श्री. संदीप चव्हाण या तलाठी आप्पांकडे अतिरिक्त कामाचा भार देत वडगाव अंबे तलाठी कार्यालयात त्यांची प्रभारी तलाठी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
परंतु या आप्पांकडे वरखेडी ही सजा असून ते तेथील कामकाज सांभाळून वडगाव अंबे येथील तलाठी कार्यालयात आठवडाभरातून फक्त मंगळवार व शुक्रवार हे दोनच दिवस येत असल्याने या दोनच दिवसात ते वडगाव अंबे तलाठी कार्यालयातील कामकाज पूर्ण करु शकत नाहीत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वडगाव अंबे सजेतील वडगाव अंबे, वडगाव अंबे खुर्द, वडगाव अंबे बुद्रुक, वडगाव जोगे, कोकडी तांडा व कोल्हे या गावांचा समावेश असून वरखेडी सजेत वरखेडी खुर्द, वरखेडी बुद्रुक, भोकरी, सावखेडा बुद्रुक, लोहारी बुद्रुक या अकरा गावांचा समावेश आहे. दोघेही सजेतील शेतशिवाराची भौगोलिक व्याप्ती मोठी असल्याने हे कामकाज एकटेच तलाठी यांना सांभाळणे कठीण जात आहे.
कारण आता तलाठी कार्यालयातील संपूर्ण कामकाज संगणकीय झाले असून उतारे काढणे, पिक पेरा लावणे, बोझा बसवणे, बोझा कमी करणे, फेरफार नोंदी करणे व इतर कामे करण्यासाठी इंटरनेट सुविधा व विद्यूत पुरवठा असणे गरजेचे असते परंतु तलाठी हे आठवड्यातून फक्त दोन दिवस वडगाव अंबे येथे आल्यानंतर कधी विद्यूत पुरवठा नसतो तर कधी इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने सर्व्हर काम करत नाही. म्हणून अनेक समस्यांना सामोरे जावे लागते या कारणास्तव शेतकऱ्यांना वेळेवर उतारे मिळत नसल्याने व इतर कामकाज होत नसल्याने शेतकरी तलाठी आप्पांशी हुज्जत घालतात. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर कागदपत्रे मिळत नसल्याने शासनाच्या विविध योजना व अनुदान मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
म्हणून वडगाव अंबे येथे स्वतंत्र तलाठी आप्पांची नेमणूक करुन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्वरीत दुर कराव्यात अशी मागणी वरखेडी व वडगाव अंबे सजेतील शेतकऱ्यांनी केली आहे.