बिल्धी धरण परिसरातून विद्यूत पंपाची चोरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१२/२०२१
पाचोरा येथून जवळच असलेल्या बिल्धी धरण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन विद्युत पंपांची चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बिल्धी येथील शेतकरी गुलाबसिंग हिलाल पाटील व शांताराम धोंडू चांभार यांनी बिल्धी धरणावरुन पाणी उचल करण्यासाठी रीतसर परवानगी घेतली असून या वर्षीच्या रब्बी हंगामासाठी त्यांनी बिल्धी धरणावर पाच अश्वशक्तीचे विद्युत पंप बसवले होते. परंतु हे विद्यूत पंप अज्ञात चोरट्यांनी मंगळवार रात्री ते बुधवार सकाळपर्यंतच्या दरम्यान चोरून नेले असल्याचे सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर लक्षात आले आहे.
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीला कंटाळलेला शेतकरी आधिच संकटात सापडला आहे. त्यातच अजून पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्यात भुरट्या चोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून हे चोरटे शेतशिवारातील तसेच धरण परिसरातील विद्यूत पंप व शेती अवजारांची चोरी करत असल्याने शेतकरी अजूनच संकटात सापडला असून ऐनवेळी पिकांना पाणी भरण्यासाठी पुन्हा नवीन महागडा वीद्यूत पंप घेणे शक्य नसल्याने आर्थिक अडचणी येत आहेत.
या दोघेही शेतकऱ्यांचे प्रत्येकी अंदाजे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून पिकांना वेळेवर पाणी न दिल्यास पिकांचे उत्पादनात घट होईल हे वेगळेच.
शेती शिवारातील शेती अवजारे व विद्युत पंप चोरी जाऊ नये म्हणून शेतशिवारातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन रात्रपाळीसाठी सुरक्षारक्षक नेमावा किंवा गटागटाने शेती शिवारात लक्ष द्यावे असे केल्याने चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल असे मत काही सुज्ञ नागरिक व शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून लवकरच अशी योजना सुरु करण्यासाठी शेतकरी लवकरच बैठक घेणार असल्याचे समजते.