कोल्हे गावात स्वच्छालय वाटपाची चौकशी करण्याची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावात अनुदानित शौचालय वाटपामध्ये गैरप्रकार झाला असल्याने या शौचालय वाटपाची चौकशी होऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांना योग्य ते शासन व्हावे शौचालयासाठी दिलेले अनुदान वसुल करण्यात यावे अशी मागणी मा.गटविकास अधिकारी पाचोरा यांच्याकडे कोल्हे येथील सतीश संतोष गोपाळ व शकुर गफूर तडवी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
एका बाजूला शासन १००% गाव हगणदारी मुक्तीसाठी प्रयत्न करत असतांनाच दुसऱ्या बाजूला शासनातर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानित शौचालयाचे वाटपात व बांधकामात मोठा गैरप्रकार झाला असल्याचे सर्वदूर जाणवत आहे. असाच काहीसा प्रकार कोल्हे गावात झालेला असून स्वतः सरपंच यांच्याकडे सुद्धा आजतागायत शौचालय नसल्याचे अर्जदारांनी अर्जात नमूद केले असून निवडणूक लढवताना संबंधित सरपंचांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याचा आरोप तक्रारी अर्जात केला आहे.
तसेच स्वच्छ भारत मिशन योजना अंतर्गत एका कुटुंबातील दोन, दोन व्यक्तींना लाभ देण्यात आला असून त्यांनाच परत एम.आर.जी.एस. या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे. तसेच बऱ्यापैकी ग्रामस्थांनी अनुदानित शौचालय घेतले असून काहींनी प्रत्यक्षात स्वच्छालय बांधलेली नाहीत, तर काहींनी स्वच्छालयचा वापर गोवऱ्या व लाकडे भरण्यासाठी सुरू केला आहे। या सर्व प्रकाराची चौकशी होऊ संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व सरपंच आणि दिलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्राची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे नमूद केले असून या शौचालय वाटपात झालेल्या वशिलेबाजी व भ्रष्टाचाराने कोल्हे गावात हगणदारी मुक्तीचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून येते.