कर्जवसुली प्रतिनिधीच्या तगाद्याला वैतागून, कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथून जवळच सार्वे व पिंप्री ही दोन छोटी गावे असून पिंप्री प.लो. येथील अल्पभूधारक शेतकरी अल्लाउद्दीन सांडू तडवी वय (४२) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दिनांक ३० डिसेंबर गुरुवार रात्री ते ३१ डिसेंबर शुक्रवार सकाळच्या दरम्यान घराजवळच्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की अल्लाउद्दीन तडवी हा अल्पभूधारक शेतकरी असून दोन एकर शेतजमीन आहे. पत्नी, २ मुले, १ मुलगी, सुन असा परिवार आहे. दोन एकर शेतजमीन कसून व मोलमजुरी करुन हे कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत होते. परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेताचे उत्पन्न हाती आले नाही. झालेला खर्चही हाती न आल्याने त्यातच घर संसाराचा गाडा ओढतांना दैनंदिन लागणारा खर्च व कधीकधी आजारपण व इतर संकटात लागणारा खर्च यातच अल्लाउद्दीन हतबल झाला होता.
म्हणून कुठूनतरी कर्ज काढून संसाराचा गाडा ओढायचा या हेतूने त्याने भारत फायनान्स, स्वतंत्र फायनान्स व ग्रामशक्ती फायनान्स या खाजगी फायनान्सच्या माध्यमातून कर्ज घेऊन मरणाला रात्र आडवी केली होती. व मोलमजुरी करुन कर्जफेड करु अशी अपेक्षा होती. परंतु अपेक्षेप्रमाणे मोलमजुरी मिळत नसल्याने घरसंसार चालवून बचत गटाचा हप्ता फेडणे मुश्कील झाले होते. परंतु नियमाप्रमाणे बचतगटाचा वसुली प्रतिनिधी कर्जवसुलीसाठी सतत तगादा लावून घराभोवती फिरत होता. या सततच्या तगाद्याला वैतागून व घरासमोर कर्जवसुलीसाठी येणारा प्रतिनिधी यामुळे मानसिक तणावाखाली आल्याने अल्लाउद्दीन याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे सार्वे, पिंप्री गावातील जनमानसातून समजते.
पुढील बातमी विद्यूत वितरण कंपनीच्या विरोधात.
(एका बाजूला बुलेट ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे पिंप्री गावातील तडवी बांधवांच्या वस्तीत चिंचेच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरात विद्यूत वितरण कंपनीच्या आठमुठेपणामुळे अद्यापही विद्यूत पुरवठा देण्यात आलेला नाही. ही शोकांतिका आहे.)