कोल्हे गावात गावठी दारू विक्रेत्यांची कोल्हेकुई, दारु विक्री बंद करा म्हणणाऱ्या तंटामुक्ती अध्यक्षांना शिवीगाळ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१०/२०२२

(मागील काळात १७ वर्षे दारुबंदी असलेल्या कोल्हे गावात दारुची खुलेआम विक्री होत असल्याने महिला व ग्रामस्थ संतप्त)

पाचोरा तालुक्यातील व पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोल्हे या छोट्याशा गावात गावठी दारू निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने कोल्हे गावात दारु विक्रेते व दारुड्यांचा दिवसभर धिंगाणा सुरू असतो. सद्यस्थितीत महिलावर्ग शेतात कापूस वेचणीसाठी जातात तर त्यांच्या घरी राहाणारे कुटुंबप्रमुख हे काहीही कामधंदा न करता महीलांनी कमाऊन आनलेले पैसे हिसकावून घेत दारुच्या व्यसनासाठी खर्च करत असल्याने घराघरातील मुलाबाळांना व कष्टकरी महिलांना उपाशीपोटी राहुन दिवस काढावे लागत आहेत. तसेच हे दारुडे भरवस्तीत मुबलक दारु मिळत असल्याने भरवस्तीत व गल्लीबोळात धिंगाणा घालुन सभ्य लोकांना शिवीगाळ करत असल्याने कोल्हे गावातील शांतता भंग झाली असून दररोज लहानमोठी भांडणे होत आहेत.

याबाबत गावातील महिलांनी तंटामुक्ती अध्यक्ष व प्रतिष्ठित लोकांना दारुबंदी करण्यासाठी साकडे घातले होते महिलांची दयनीय अवस्था पाहून गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व काही ग्रामस्थांनी अवैधरित्या गावठी दारू निर्मिती व विक्री करणारांना समज देऊन दारुबंदी करण्यासाठी विनंती केली परंतु या दारु विक्रेत्यांनी काही एक एकुण न घेता तंटामुक्ती अध्यक्षांना व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजवण्याच्या हेतुने केविलवाणा प्रयत्न केला आहे.

म्हणून आता कोल्हे येथील महिलावर्ग लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून दारुबंदी अधिकारी व पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना कायमस्वरूपी दारुबंदी करण्यासाठी साकडे घालणार असल्याचे महिला व ग्रामस्थांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या