कुऱ्हाड गावातील अवैधधंदे करणारांना चढलाय माज, अवैधधंद्याचा विरोध करणारांना वाटायला लागली लाज.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या गावात सट्टा, पत्ता, जुगार, मटका, देशी व गावठी दारु विक्रीच्या व्यवसायासह सगळेच अवैधधंदे राजरोसपणे दिवसाढवळ्या रात्रंदिवस बिनबोभाट व बिनधास्त पणे सुरु आहेत. हे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत म्हणून मागील दोन वर्षापूर्वी महिलांनी आंदोलन केले होते. तसेच तेव्हापासून आजपर्यंत गावकुसातील नागरिक, महिला व सुज्ञ नागरिकांनी सतत अर्ज फाटे करत तसेच प्रसारमाध्यमांच्या मदतीने कुऱ्हाड गावातील सर्व प्रकारचे अवैधधंदे बंद व्हावेत म्हणून शासन व प्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रारी करुनही हे अवैधधंदे बंद तर होत नाहीच परंतु पुन्हा जोमाने सुरु होत असल्याने (कुऱ्हाड गावातील अवैधधंदे करणारांना चढलाय माज, अवैधधंद्याचा विरोध करणारांना वाटायला लागली लाज.) असे मत वैतागलेल्या ग्रामस्थ व महिला व्यक्त करत आहेत.
कारण कुऱ्हाड गावात सुरु असलेले अवैधधंदे हे हमरस्त्यावर, बसस्थानक परिसरात, धार्मिक स्थळांजवळ सुरु आहेत. याच ठिकाणी सार्वे, जामने, सांगवी, बिल्धी, नाईकनगर या गावातील व्यसनाधीन लोक व्यसन पूर्तीसाठी येत असल्याने गावातील शांतता भंग झाली असून दररोज लहानमोठे वाद होत आहेत. तसेच कुराड येथून आंबे वडगाव, आंबे वडगाव तांडा नंबर १ आंबे वडगाव तांडा नंबर २ येथे ठोक पद्धतीने ५ ते १० लिटरचे कॅन भरून गावठी दारू पुरवली जाते. यामुळे कुऱ्हाड गावातील अवैध धंदे सुरु असल्यामुळे आसपासच्या दहा खेड्यांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे.
याबाबत तक्रार केल्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते मात्र लगेचच अवैध धंदे कायमस्वरूपी सुरू असतात तरी या अवैध धंदे करणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करून त्यांच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
तसेच ग्रामस्थांनी अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे ठराव मागितला असून येता १६ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेत अवैधधंदे बंद करण्याची जोरदार मागणी केली जाणार असल्याची चर्चा कुऱ्हाड गावात सुरु आहे.
(यांचे पाठीराखे कोण)
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी कुऱ्हाड गावातील अवैधधंदे बंद करण्यासाठी वारंवार धाडसत्र राबवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र पोलिस गावात आले की अवैधधंदे तात्पुरते बंद होतात व पोलिस निघून गेल्यानंतर पून्हा सुरू होतात. म्हणून यांच्या पाठीवर कोणत्या अदभूत शक्तीचा हात आहे हे समजून घेत ते उघड करणे गरजेचे आहे.
(ऐकावे ते नवलच)
एका बाजूला पिंपळगाव हरेश्वर पोलिस वारंवार कारवाई करतात मात्र दुसरीकडे गावठी व देशी दारुचे अवैधधंदे करणारांकडून दारुबंदी खात्याला नियमितपणे हप्ते पोहच केले जातात अशी खात्रीपूर्वक माहिती काही सुज्ञ नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सत्यजीत न्यूजकडे कथन केली असल्याने हे हप्ते वसूल करणारे दारुबंदी अधिकारी कोण ? किंवा यांच्या नावाखाली कुणीतरी परस्पर बाजार तर करत नाही ना ? अशीही शंका उपस्थित केली जात आहे. तसेच दारुबंदी करण्यासाठी दारुबंदी खाते ही स्वतंत्र यंत्रणा असल्यावरही कुऱ्हाड गावात या विभागामार्फत अद्याप एकही कारवाई झाली नसल्याने हप्ते बाजीच्या विषयाला सहजपणे पुष्टी मिळते तेवढे मात्र खरे आहे.