गुटखाबंदी असतांनाही पाचोरा शहरासह तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री, कारवाईची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२२

महाराष्ट्र राज्यात २०१२ पासून गुटखाबंदी असतानाही ‘अन्न सुरक्षा मानदे कायदा’ पायदळी तुडवीत पाचोरा शहरासह खेडेगावातील प्रत्येक किराणा दुकान, पानटपरीवर तसेच वाहतूकीच्या मुख्य रस्त्यावरील हॉटेलमध्ये अवैधरीत्या खर्रा, गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची राजरोसपणे सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे. या गुटखा व्यवसायात पाचोरा शहर मुख्य केंद्र असल्याचे बोलले जात असून पाचोरा शहरातील गुटखा किंगचे नाव सर्वसामान्य जनतेतून उघड, उघड घेतले जात आहे. हा शासनाने बंदी घातलेला गुटखा कुठुन येतो, कुठे साठवला जातो नंतर साठवणूक केलेल्या गुटख्याची विक्री व पुरवठा अश्या पध्दतीने केला जातो याबाबत सर्वसामान्य जनतेतून खमंग चर्चा रंगत असतांनाच अन्न व औषध प्रशासनाला व कायद्याच्या रक्षकांना ही बाब माहीत नसावी म्हणजे नवलच.

विशेष म्हणजे अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ विनियमन २०११ नुसार गुटखा विक्री करणे किंवा वितरण करणे गुन्हा ठरतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन हा स्वतंत्र विभाग आहे. तसेच  महाराष्ट्र राज्यात २०१२ पासून गुटखा बंदी करण्यात आली असली तरी सर्वदूर छुप्या मार्गाने शहरात अवैध गुटखा विक्री सुरूच आहे. ठिकठिकाणी पानविक्री करण्याऐवजी घातक तंबाखूचा खर्रा, गुटख्याच्या पुड्या, सुगंधित तंबाखू, पानमसाल्याची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे तरुणाई व्यसनाधीन होत असून त्यांना कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत असल्याने पाचोरा शहरातील व तालुक्यातील अवैध रीत्या सुरु असलेली गुटखा विक्री अन्न व औषध प्रशासनातर्फे त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

(कारवाई किरकोळ विक्रेत्यांवर न करता होलसेल गुटख्याची विक्री
——————————————–
करणाऱ्या गुटखा किंग वर करण्यात यावी.)
——————————————–

तसेच आजपर्यंत अन्न व औषध प्रशासनाने पानटपरी किंवा किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली आहे व अधुनमधून किरकोळ विक्रेत्यांवर बऱ्याच वेळा कारवाई करतांना मोठा गाजावाजा करण्यात येतो मात्र होलसेल गुटख्याची विक्री करणाऱ्या गुटखा किंगवर अद्यापही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने अन्न व औषध प्रशासन विभागातील (एफ. डी. एस.) अधिकारी हे आतून किर्तन बाहेरुन तमाशा करुन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत नाही ना ? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या