तांदळाच्या मोबदल्यात भांडी घ्या, भांडी. भांडी विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/११/२०२१
(दैव देते कर्म नेते)
आजच्या युगात दैनंदिन व्यवहारात नवनवीन बदल होत असतांना दिसून येत आहेत. असाच काहीसा बदल सद्यस्थितीत दिसून येत आहे. काही वर्षापूर्वी आपल्या पोटाची भुकेल भागवण्यासाठी भांडी विकून अन्नधान्य घेऊन आपल्या संसाराचा गाडा ओढतांना मी पाहिले आहे. १९७२ च्या दुष्काळात तांब्या, पितळेची भांडी विकून धान्य घेऊन मरणाला रात्र आडवी करुन दिवस काढले आहेत.
परंतु आजची परिस्थिती वेगळीच पहावयास मिळत आहे. शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून मोफत व शासकीय दरात गहू, तांदळाचे वाटप केले जात आहे. यातच भरीत भर म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लॉकडाऊच्या कालावधीत हाताला काम नसल्याने कुणावरही उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून वाढीव धान्य वाटप करण्यात आले व आजही ही योजना सुरुच आहे.
मात्र या योजनेतून मिळणारे धान्य मागील काही महिन्यापासून लाभधारक दहा रुपये किलोने विकतांना दिसून येत आहेत. हे तांदूळ घेण्यासाठी गावागावात गल्लीबोळात काही व्यवसायिक फेरी मारून ‘तांदूळ देता का तांदूळ’ असा आवाज देऊन प्रति किलो दहा रुपये प्रमाणे खरेदी करत आहेत. तर काही व्यवसायिक तांदळाच्या बदल्यात स्टीलचे भांडे देऊन तांदूळ घेत आहेत.
या प्रकारामुळे शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या रास्त भाव तांदळाची व अन्नधान्याची गैर मार्गाने खरेदी-विक्री होत असून शासनाच्या तिजोरीवर हकनाक बोजा वाढत असल्याचे मत सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केले जात असून स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या मोफत व स्वस्त धान्याची योजना योग्य लाभार्थ्यांना देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
(कटू सत्य)
बऱ्याचशा गावात व्यसनाधीन लोक तांदूळ देऊन त्याबदल्यात गावठी व देशी दारू विकत घेऊन आपली व्यसनपूर्ती करतांना दिसून येतात. दुसरीकडे मात्र यांची मुलेबाळे उपाशीपोटी झोपताना दिसतात. तर काही सटोडे, जुगार खेळणारे तांदळाची विक्री करून आपली तलफ भागवत असल्याने शासन फुटक्या घड्यात पाणी भरत असल्यासारखे होत असल्याचे मत जनमानसातून व्यक्त केले जात आहे.
(तुझे आहे तुजपाशी पण तू जागा भुललासी)