लडाख गटाचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे – अमित शाह यांच्या आश्वासनानंतर निर्णय

नवी दिल्ली – लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार्या लेहमधील प्रभावशाली गटाने, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आश्वासनानंतर बहिष्काराचा निर्णय आज रविवारी मागे घेतला.
स्थानिक भाषा, नोकर्या, जमीन आणि भौगोलिक रचनेची पूर्ण सुरक्षा करण्यात यावी, अशी मागणी या गटाने केली होती. अमित शाह यांनी त्यांची मागणी मान्य केली. या केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांच्या हक्कावर कुठलीही गदा येणार नाही, या प्रदेशाचे रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे आणि ती पार पाडली जाईल, अशी हमी देखील त्यांनी दिली. अमित शाह यांना गटाचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर काही वेळातच एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. लडाखचे माजी खासदार ठिकसे रिम्पोचे, थुपसन चेवांग, जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री शेरिंग दोरजे आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू व जी. किशन रेड्डी यांनी हे निवेदन दिले. अमित शाह यांच्या आश्वासनावर आमचा विश्वास आहे आणि आमच्या मागण्या मान्य होतील, याबाबत आता काहीच शंका नसल्यामुळे आम्ही निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला आहे, असे यात नमूद आहे.