तलाठ्यांची करामत, अनेकांची फसगत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०६/२०२१
महसूल विभागात तलाठी आप्पांची भूमिका महत्त्वाची असते.आजच्या परिस्थितीत तलाठी आप्पांना ब्रम्हदेवाची उपमा दिली तरी वावगे ठरणार नाही.कारण ब्रम्हदेवाने जे लिहिले ते कोणीही मिटवू शकत नाही अशी अख्यायिका आहे.
परंतु आता ग्रामीण भागातील जनतेच्या मजबुरीचा व अडाणीपणाचा फायदा घेत काही ठिकाणी (सगळेच नाही काही तलाठी) स्वताच्या आर्थिक लाभापोटी मुळ शेत मालकाला लेखी किंवा कोणत्याही तोंडी सुचना न देता भाऊबंदकीच्या वादाचा फायदा घेत वडिलोपार्जित इस्टेटमध्ये वारस हक्क लावणे, वारस हक्क परस्पर उडवणे, एकाच्या शेतावर दुसऱ्याच्या नावाचे पीकपेरे (भोगवटा) लावणे किंवा गायरान जमीन, ट्रस्टच्या मालकीची जमीन, गावठाण जमीन किंवा पडीक जमिनीवर मालकी हक्क (भोगवटा) लावणे, तसेच नकाशातील वहिवाटी रस्त्याच्या नकाशावर फेरबदल करणे, याची विहीर त्यांच्या नावे लाऊन विहीर चोरीला गेल्याचे प्रकार करणे, असे प्रताप करत असल्याने जुन महिन्याचे सुरवातीला पीककर्ज काढण्यासाठी अडचणी येतात तसेच भोगवटेदार व वारसाहक्काची फेरफार झाल्यावर मुळ मालक व प्रतिवादी यांच्यात भांडण तंटे, मारामाऱ्या होणे एवढ्यावरच न थांबता बऱ्याचशा ठिकाणी खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत व घडत आहे.
नेमके स्वताच्या आर्थिक लाभासाठी वरिल प्रकारे गैरप्रकार करणारे तलाठी किंवा संबधीत अधिकारी हे कोऱ्या कागदावर काळी रेषा मारुन जातात परंतु नंतर इमानेइतबारे जगणाऱ्या कष्टकरी, शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी महसूल विभात व तेथेही न्याय न मिळाल्यास न्यायालयात वर्षानुवर्षे फिरावे लागते हे करत असतांना संबंधित अन्यायग्रस्त व्यक्तीला नहाकच आर्थिक भूदंड सहन करत हातचे कामकाज सोडून ठोकरा खात फिरावे लागत असल्याचे दिसून येते.
जुन्या जाणकारांच्या मते ब्रिटिश राजवट असतांना दर तिन वर्षातून एकवेळ महसूल विभागामार्फत शिवार मोजणी होऊन हद्द कायम केल्या जात होत्या परंतु आता तसे राहिले नसल्याने दरवर्षी हजारो दावे पोलिस ठाण्यात व न्यायालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे व वाढत आहे.
तरी आर्थिक लाभासाठी महसूल विभागातील कोणतेही कर्मचारी किंवा अधिकारी हे असे कामकाज करत असतील तर यांची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी होऊन कडक कारवाई झाल्यास हा गैरप्रकार थांबेल असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.