गावच गाव जळे, हनुमान बेंबी चोळे. ग्रामीण भागातून लॉकडाऊचा फज्जा, सरपंच व पोलीस पाटलांची बघ्याची भुमिका.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०५/२०२१
सूचना = ही बातमी बनवतांना आमचे कोणाशीही व्यक्तीगत वाद किंवा मतभेद नसून फक्त आणि फक्त लॉकडाउन पाळण्यात यावा व कोरोनाचा समूळ नायनाट व्हावा या हेतूने ही बातमी लिहिली आहे.
तसेच ज्या कर्तव्यदक्ष सरपंच व पोलिस पाटलांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले असेल त्यांनी या बातमीत पोलीस पाटील व सरपंचाबद्दल केलेला आरोप मनाशी लावून न घेता ज्यांनी ज्यांनी जबाबदारी स्वीकारली नसेल त्यांच्यासाठी व त्यांना जागे करण्यासाठी आम्ही या बातमीच्या माध्यमातून हा प्रयत्न करीत आहोत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मानवी साखळी खंडित करणे हा एकमेव सुरक्षित उपाय असल्या कारणाने शासन प्रशासनाने लॉकडाऊन, जनताकर्फ्यू, ब्रेक द चेन व आता क्रॅक डाऊन घोषित करून कडकडीत बंद पुकारला आहे. लॉकडाऊनच्या शब्दात बदल होत असला तरी आपला हेतू एकच आहे की काही दिवस मानवी साखळी खंडित करुन कोरोनाचा संसर्ग थांबवणे.
परंतु केंदसरकार, राज्यसरकार, जिल्हा व तालुखास्थरीय प्रशासन हे वारंवार नियमावली जाहीर करतात परंतु ही जाहीर केलेली नियमावली खरोखरच आमलात आणून त्या नियमावलीचे काटेकोर पालन केलेजात नसल्याने कोरोनाची साखळी खंडित करण्यात आपल्याला अपयश येत असल्याचे निदर्शनास येते.
[गावच गाव जळे, हनुमान बेंबी चोळे]
यामागील मुख्य कारण म्हणजे खेडेगावात ज्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यापैकी काही सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक हे इमानेइतबारे आपली जबाबदारी पार पाडतांना दिसून येत नाहीत. यात महत्त्वाचे म्हणजे कोरोनासारख्या महामारीच्या कालावधीही तलाठी व ग्रामसेवक हे मुख्यालयात रहात नसल्याने गावात काय घटना घडतात याची माहिती लवकर मिळत नाही. तसेच मिळालीच तर काही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
याचे जिवंत उदाहरण म्हणजे अक्षय तृतीया सणाच्या कालावधीत शहरातील व गावागावात खेड्यापाड्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ठराविक वेळात सुरू होती. व ज्यांनी नियम मोडले त्याच्यावर कडक कारवाई केली जात असतांनाच, दुसरीकडे मात्र जुगाराचे अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू झाले होते. तसेच आजही सुरू आहेत. याबाबत गावागावातू सुज्ञ नागरिक व माता भगिनींनी गावठीदारु व देशीदारुची अवैध विक्री व जुगाराचे अड्डे त्वरित बंद करावे म्हणून वारंवार मागणी करून तसेच थेट संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावरही अद्यापही हे अवैध धंदे दिवसाढवळ्या चोवीस तास सुरू असून ज्यांनी ज्यांनी या अवैधधंद्यांचे विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रयत केला त्यांनाच वेठीस धरण्यात आल्याचा अनुभव आल्याचे सुज्ञ नागरिक सांगतात.तसेच किराणा दुकानासह कटिंग सलून, टेलरिंग दुकान सुरू आहेत. चावडीवर बैठकीत गर्दी, अंत्यविधीसाठी गर्दी होतांना दिसून येते.
त्याचप्रमाणे शहरी भागातून बियर बार, वाईन शॉप, दारूचे दुकान बंद असल्याने तळीरामांची फजित होत आहे.म्हणून त्यांनी खेडेगावात धाव घेतली असल्याने या संधीचे सोने करत खेडेगावातून रसायन मिस्रीत गावठी दारू निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच चोरट्या मार्गाने देशी दारू मिळवून गावात, भरवस्तीत, भररस्त्यावर, भरचौकात, धार्मिक स्थळांजवळ खुलेआम दारू विक्री सुरू असल्याने या गावठी व देशी दारूच्या अड्ड्यावर तसेच सट्टा पेढीच्या ठिकाणी एकत्र गर्दी जमा होऊन सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे.
याबाबत अद्याप पर्यंत एकही पोलीस पाटील किंवा सरपंच यांनी आपल्या जवळील पोलिस स्टेशनला खबर दिल्याचा एकही पुरावा समोर आलेला नसल्याने
(गावचे गाव जळे,हनुमान बेंबी चोळे) असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
(म्हणून आता ज्या गावातून लॉकडाऊनचे नियम पाळले जाणार नाहीत त्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी व ग्रामसेवक यांना जबाबदार धरुन कारवाई झाल्याशिवाय लॉकडाऊनचा हेतू साध्य होणार नाही. असे मत सुज्ञनागरीकांनी व्यक्त केले असून दोन,चार नालायक लोकांच्या चुकीच्या वागणूकीने नहाकच सर्व जनता वेठीस धरली जात असल्याची खंत व्यक्त केली आहे.)
(तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव कसा झाला याबाबत थोडक्यात आढावा.)
यामागचे मुख्य कारण म्हणजे सुरवातीला जेव्हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन पुकारण्यात आला तेव्हा फक्त शहरी भागातच लक्ष देऊन शहरातील नियम कडक करतांना सर्वप्रथम मॉल, मंगलकार्यालये बंद करून सार्वजनिक कार्यक्रमावर बंदि घालण्यात आली.मात्र हे नियम फक्त शहरी भागात काटेकोरपणे राबवले गेल्याने शहरातील लोकांनी खेडेगावात कोणतीही भीती नसल्याने खेडेगावात धाव घेऊन खेडेगावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी आप्पा, ग्रामसेवक आप्पा यांच्या पाठीवर हात फिरवत थोडक्यात हरभऱ्याच्या झाडावर चढवून [जंगल मे मंगल] सोयीचे करुन मोठ्याप्रमाणात व भरपूर लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळे, साखरपुडा, नवस, पार्ट्या साजऱ्या करण्याकडे भर दिला.
यातच भरती भर म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांचे कार्यक्रम साजरे करून घेण्यासाठी तालुक्यातील जेष्ठ, श्रेष्ठ, प्रतिष्ठित, राजकारणी, पदाधिकारी, यांनी या कार्यकर्त्यांची पाठराखण करण्याचे काम केल्यामुळे तर काही ठिकाणी स्वताच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येत कार्यक्रम पार पाडून घेतले. हे सगळे घडत असतांना (सत्ते पुढे शहाणपण चालत नाही) म्हणून संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना कारवाई करतांना अडचणी आल्याने ग्रामीण भागात कोणतीही कारवाई होत नाही. असे पाहून खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊनच्या नियमांचे पालन झाले नाही म्हणून खेड्यापाड्यातून कोरोनाची लागण झपाट्याने झाल्याचे दिसून येते आहे.