मजुर मिळत नसल्याने ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य लागले कामाला.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०५/२०२१
राजकारण म्हटले म्हणजे पुढारपण करण्यासाठी सत्ता मिळवणे एकदाची खुर्ची मिळाली म्हणजे बगळ्यासारखे पांढरेशुभ्र कपडे घालून दिमाखात फिरणे असा प्रकार बऱ्याचपैकी अनुभवाला व बघायला येतो परंतु अंबे वडगाव येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य याला अपवाद ठरले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनीत काहीतरी बिघाड झाल्यामुळे मागील पंधरा दिवसापासून पाण्याच्या टाकीपासून पाणी सोडल्यानंतर गावातील नळांना पाणी येत नव्हते म्हणून या पाईपलाईनीत माती किंवा काही केरकचरा अडकला असावा असा संशय आल्यामुळे ही पाईपलाईन खोदून पाहणे गरजेचे होते.
परंतु हे काम करुन घेण्यासाठी मजुर उपलब्ध होत नव्हते व भर उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू लागल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. भरपूर प्रयत्न करुनही मजूर मिळत नाहीत व पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल पहावत नाही. या विवंचनेत ग्रामपंचायत सरपंच व सदस्य मजूरांचा शोध घेण्यात अपयशी ठरले शेवटी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती कमलबाई शकळे यांचा मुलगा विनायक शळके, ग्रामपंचायत सदस्य कायदेतज्ञ मंगेशराव गायकवाड, श्री. बबलू तडवी, पाणीपुरवठा कर्मचारी श्री. मंगेश खैरनार, कारकून श्री. सुनील निकम, सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रदिप सानप, गजानन गायकवाड यांनी हातात टिकाव, फावडे घेऊन पाईपलाईन दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरु केले.
मजूर मिळत नसल्याने शेवटी ग्रामपंचायत सरपंच पुत्र, सदस्य व कर्मचाऱ्यांनी भर उन्हात घाम गाळून ग्रामस्थांना पिण्यासाठी शुध्द व पूरेपूर पाणी कसे पुरवता येईल याकरिता जो प्रयत्न केला व करत आहे. ही बाब खरच कौतुकास्पद असून याबाबत ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहे.