दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२३

चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिसादेवी रोडवर एक ५० वर्षीय अज्ञात इसम अत्यावस्त परिस्थितीत बेवारस अवस्थेत आढळुन आला होता. ही बाब लक्षात येताच चिखलठाणा ग्रामीण पोलीसांनी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने सदर इसमाला उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटीच्या रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात दाखल करताच तेथील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरु केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता किंवा नियतीला ते मान्य नसावे म्हणून की काय उपचारादरम्यान त्या बेवारस स्थितीत आढळलेल्या इसमाचा मृत्यू झाला.

तदनंतर संबंधित मयत इसमाची ओळख पटवण्याकरीता मृतदेह घटी शासकीय रुग्णालयातील शवगृहात ठेवले असता तीन दिवस उलटले तरीही मयताची ओळख न पटल्यामुळे किंवा कुणीही नातेवाईक मिळून न आल्याने मयताचा अंतिम विधी करणे गरजेचे असल्याने चिखलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. रविंद्र खांडेकर यांनी माणूसकी समूहाचे समाजसेवक मा. श्री. सुमित पंडित यांना भ्रमणध्वनीवर घडलेला प्रसंग व बेवारस इसम मयत झाला असून त्याच्यावर अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे असे सांगितले.

ही परिस्थिती ऐकून घेत माणूसकी समूहाचे मा. श्री. सुमित पंडित यांनी क्षणाचाही विलंब न करता माणूसकी समूहाच्या माध्यमातून त्या बेवारस इसमावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारुन तातडीने घाटी शासकीय रुग्णालयात धाव घेतली व संबंधित बेवारस इसमाचा मृतदेह ताब्यात घेऊन लगेचच शव वाहिनीतून बेगमपुरा येथील स्मशानभूमीत नेऊन त्या ठिकाणी चिखलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. रविंद्र खांडेकर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र साहेब, पोलीस हेड कॉन्स्टेबल आदीनाथ शेकडे व माणूसकी समूहाचे सुमित पंडित, आकाश ढवळे, किरण रावल, प्रा. शरद सोनवणे माणूसकी टीमचे सदस्य व पोलीस कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीसाठी मदतकार्य केले.

**********************************************************
“माणूसकी टीमच्या माध्यमातून पोलीसांना वेळोवेळी मदत मिळते, पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर”
**********************************************************
दोन हात, दोन पाय एक डोक घेऊन जन्माला आल म्हणजे तो माणूस असे नव्हे तर ज्या माणसाजवळ मन, भावना व जनसेवेचा वसा व माणूसकी असेल तोच खरा माणूस असाच काहीसा अनुभव आम्हाला माणूसकी टीमच्या माध्यमातून अनुभवायला येत आहे. माणूसकी समूह हा काही गावांपूरता मर्यादित नसून सगळीकडे रस्त्यावर फिरणाऱ्या वेड्याबागळ्यांची सेवा करण्यासाठी माणूसकी वृध्दाश्रमाच्या माध्यमातून अनाथ भटक्यांची काळजी घेऊन औषधोपचार तसेच बेवारस आढळून येणाऱ्या मयताच्या अंत्यविधीसाठी माणूसकी समूहाची पोलीसांना फार मोठी मदत होत असते. माणूसकी समूहाबद्दल बोलायचे झाल्यास शब्द अपूर्ण पडतील असे या समूहाचे काम आहे असे मत चिखलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे जेष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. रविंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले.