विद्युत वितरण कंपनीकडून ग्रामपंचायतीच्या ठरावाला केराची टोपली.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०४/२०२१
पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव, आंबे वडगाव खुर्द, आंबे वडगाव बुद्रुक, वडगाव जोगे, कोकडी तांडा या पाच गावांसाठी विद्युत वितरणीच्या दोन कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
परंतु नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात रहाणे क्रमप्राप्त असल्यावरही एक कर्मचारी पहुर येथून तर दुसरा कर्मचारी पाचोरा येथून येऊन जाऊन काम बघतात तसेच हे नियमितपणे मुख्यालयाचे गावी येत नसल्याने वरिल पाचही गावांचा विद्यूतपुरवठा रामभरोसे चालत असल्याने बऱ्याचवेळा विद्यूतपुरवठयात बिघाड झाल्यावर विद्यूतग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यात महत्त्वाचे म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने वयोवृद्ध, लहान मुले, विविध आजाराचे रुग्ण यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच पिठाच्या गिरण्या बंद रहात असल्याने वेळेवर धान्य आणून उपजिविका भागवणाऱ्या गरिबांना उपवासी रहावे लागते. एखाद्या वेळेस मोठा तांत्रिक बिघाड झाल्यावर तासंतास विद्यूतपुरवठा खंडित रहातो.तसेच विद्यूतचोरी वाढली असून यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.
याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना कळवल्यानंतर ते लवकर येत नाही. किंवा झिरो वायरमनला सांगून काम पहातात. या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे गाऱ्हाणे मांडले होते. याची दखल घेत ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची त्वरित बदली करुन दुसरे कार्यक्षम व मुख्यालयात राहाणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात यावे असा ठराव दिनांक २० एप्रिल २०२० रोजी पाचोरा कार्यालयात दिला असल्यावरही आजपर्यंत यांची बदली होत नसल्याने आजपर्यंत वारंवार लेखी व तोंडी सुचना करुनही काहीच कारवाई होत नसल्याने
विद्यूत वितरणचे अधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या ठरावाला केराची टोपली दाखवत कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप विद्यूतग्राहकांनी केला असून दोघेही कर्मचारी मुख्यालयात रहावे व ते रहात नसल्यास त्यांच्या जागी दुसरे कर्मचारी नेमण्यात यावेत अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पंचक्रोशीतील विद्यूतग्राहकांनी दिला आहे.