लोहारी येथे व्यायाम शाळा व वाचनालयाची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०८/२०२३
सद्यस्थितीत सगळीकडे व्यसनाधीनता व स्वैराचारी वृत्ती वाढत चालली आहे. याकरिता तरुणांना व्यसनापासून दूर करण्यासाठी व सुदृढ व निरोगी राहण्यासाठी प्रत्येक गावागावात व्यायाम शाळा व वाचनालयाची अत्यंत गरज आहे. तसेच आजच्या परिस्थितीत गावागावात तरुण मुले व्यायाम शाळा व वाचनालयाची मागणी करत आहेत. परंतु याकडे (काही) गावागावातील सरपंच, उपसरपंच हे या तरुणांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे काही गावातून शासनस्तरावर व्यायाम शाळा मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र एका बाजूला जागा उपलब्ध नसल्याची सबब सांगून आलेला निधी तसाच पडून आहे. तर दुसरीकडे गावागावात, गावठाण हद्दीत किंवा गायरान जमिनीवर धनदांडग्यांनी अतिक्रमण करुन लाखो रुपये किंमतीच्या जागा बळकावून त्या परस्पर विक्री करुन पैसे कमावण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे.
अजून एक विशेष बाब म्हणजे गाव तेथे व्यायाम शाळा व गाव तेथे वाचनालयाची अत्यंत गरज आहे. परंतु आजच्या परिस्थितीत वाचनाल व व्यायाम शाळा या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर दुसरीकडे सर्व नियम धाब्यावर बसवून गावागावात बिअर, बार उघडण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. यामागील कारण जाणून घेतले असता बिअर, बार सुरु करण्यासाठी नाहरकत दाखला देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामविस्तार अधिकारी यांना पुरवण्यात येणाऱ्या कागदावर वजन ठेवून कागदपत्रे सादर केली जातात म्हणून गावकऱ्यांचा विचार न करता ग्रामसभेत ठराव मंजूर करुन घेतांना जाहीर दवंडी देऊन कोणतीही ग्रामसभा न घेता कागदोपत्री ग्रामसभा दाखवून बिअर, बार उघडण्यासाठी नाहरकत दाखला दिले जातात. व एकवेळ नाहरकत दाखला मिळाला म्हणजे याच बिअर, बार मधुन देशी व गावठी दारुची खुलेआम विक्री केली जात असल्याचे दिसून येते.
*महत्वाचे*
आज दिनांक १५ ऑगस्ट २०२३ मंगळवार रोजी पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर लोहारी गावातील तरुणांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना एक लेखी निवेदन देऊन व्यायाम शाळा बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे लोहारी येथे व्यायाम शाळा बांधुन मिळावी याकरिता लोहारी गावातील तरुणांनी मागील सहा वर्षांपासून संघर्ष सुरु केला आहे. व्यायाम शाळेसाठी निधीही उपलब्ध आहे. तसेच पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी लाखो रुपये किंमतीचे व्यायामाचे साहित्य दिले आहे. मात्र आजतागायत चांगली व्यायाम शाळा बांधण्यासाठी ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध करुन देण्यात येत नसल्याने आज लोहारी येथील तरुणांनी १५ ऑगस्टच्या दिवशी आक्रमक भूमिका घेत आम्हाला त्वरित जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी लावून धरली आहे.
यामागील विशेष कारण व अभिमानाची बाब म्हणजे लोहारी गावातून आजपर्यंत शंभराचे जवळपास तरुण हे देशसेवेसाठी सैन्यदलात तर काही पोलीस विभागात काम करत आहेत. हे देशसेवेसाठी झटणारे तरुण जेव्हा लोहारी गावात येतात तेव्हा ते तरुण मुलांना एकत्रित करुन त्यांना व्यायामाचे धडे देऊन अभ्यासक्रमाची माहिती देतात परंतु लोहारी गावात व्यायामाचे साहित्य आहे परंतु व्यायाम शाळा नसल्याने आज लोहारी गावातील होतकरु तरुण जामनेर, पाचोरा रस्त्यावर जिव धोक्यात घालून व्यायाम करत आहेत. तसेच स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अभ्यासाची व त्याकरिता वाचनालयाची अत्यंत गरज आहे. परंतु लोहारी गावातील तरुणांनी वारंवार मागणी करुन देखील आजपर्यंत वाचनालयाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने लोहारी येथील तरुणांना अभ्यास व वाचन करण्यासाठी दररोज तिस रुपये खर्चून पाचोरा जावे लागते आहे.
येत्या दोन महिन्यांत व्यायाम शाळा व वाचनालयाची मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.
—————————————————————-
पाचोरा तालुक्यातील लोहारी गावातील तरुणांनी मागील सहा वर्षांपासून अर्ज फाटे करुन तर कधी ग्रामसभेत विनंती अर्ज दाखल करुन सतत व्यायाम शाळा व वाचनालयाची मागणी करत आहेत. मात्र आजपर्यंत सत्तेत असलेल्या माजी व आज सत्तेवर असलेल्या सरपंच व सदस्यांनी या मागणीकडे कमालीचे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लोहारी गावातील तरुणांनी केला असून येत्या दोन महिन्यांच्या आत जर आम्हाला व्यायाम शाळा व वाचनालयाची व्यवस्था न मिळाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचा तयारीत आहोत असे मत सत्यजित न्यूज कडे व्यक्त केले आहे.