पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा छायाचित्र मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर पात्र मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन (प्रांताधिकारी राजेंद्रजी कचरे)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१८/११/२०२०
मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२१ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरनिरक्षन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे . यामध्ये १८ पाचोरा विधानसभा मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेले असून ही सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.)यांच्या मार्फत अवलोकनासाठी जाहीर करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२१ या दिनांकास १८ वर्षे वय पूर्ण करत आलेल्या व्यक्ती अथवा यापूर्वीच अठरा वर्षे वय पूर्ण होऊनही अद्यापपावेतो मतदार नोंदणी केलेली नाही अशा सर्व नागरिकांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. यासाठी संबंधित गावातील अथवा यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.)यांच्यामार्फत अथवा ऑनलाइन पद्धतीने नमुना ६ अर्ज भरून पात्र नागरिकांना मतदान नोंदणी करता येते. सदर प्रक्रिया संपूर्णपणे निशुल्क असून नाव नोंदणी नंतर पात्र मतदारांना मा. भारतीय निवडणूक आयोगामार्फत सुबक टिकाऊ आणि आकर्षक असे मतदार छायाचित्र , ओळखपत्र (ईपीक) देण्यात येते. तसेच मतदार म्हणून करावयाच्या नाव नोंदणी सोबतच , दुबार , मयत , कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नावे देखील या मोहिमेमध्ये विहित प्रक्रिया राबवून कमी करण्यात येणार आहे. तसेच या मतदारांना नावाच्या छायाचित्राच्या तपशिलात काही बदल करायचे असतील त्यांनी नमुना ८ भरून आवश्यक बदल करण्यासाठी अर्ज करावा तसेच विधानसभा क्षेत्रातील पत्त्यात बदल करायचा असल्यास नमुना आठ अ अर्ज भरून पत्त्यात बदल दुरुस्ती करून घेता येते.
अशी माहिती पाचोरा प्रांताधिकारी मा.श्री. राजेंद्रजी कचरे साहेब यांनी दिली असून संबधितांनी ठराविक वेळ व कालावधीत वरील प्रक्रिया पूर्ण करुन घ्याव्यात असे आवाहन केले आहे.