पाचोरा पोलिसांकडून पिस्टल (अग्निशस्रा) सह आरोपी जेरबंद.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०९/२०२३
पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन सापळा रचून बहुळा धरण परिसरातील गैबानशहा वली बाबांच्या दर्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाला अडवून झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ विना परवाना पिस्टल (अग्निशस्र) मिळून आल्याने सदर तरुणास ताब्यात घेत त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील गौरव राजेंद्र पाटील हा हिरो होंडा कंपनीची एम. एच. १९ डी. एच. १००३ ही मोटारसायवर विना परवाना पिस्टल (अग्निशस्र) घेऊन जळगाव कडून पाचोरा शहराकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सत्यता जाणून घेण्यासाठी पोलिस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांनी पोलिस उपनिरीक्षक मा. श्री. जितेंद्र वल्टे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे, पोलिस कॉन्स्टेबल संदिप भोई, पोलिस कॉन्स्टेबल भगवान बडगुजर यांना सायंकाळी पाच वाजता कॅबिनेटमध्ये बोलावून घेत दोन पंच सोबत देऊन जळगाव, पाचोरा रस्त्यावर गोराडखेडा गावाच्या पुढे बहुळा धरणाजवळ असलेल्या गैबानशहा वली बाबांच्या दर्गाजवळ सदर मिळालेल्या गुप्त बातमीची खात्री करण्यासाठी पाठवले होते.
पोलिस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक मा. श्री. जितेंद्र वल्टे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे, पोलिस कॉन्स्टेबल संदिप भोई हे खाजगी वाहनाने गोराडखेडा जवळील बहुळा धरणाजवळ जाऊन त्यांनी सापळा रचला असता सायंकाळी सव्वा सहा वाजता गुप्त माहितीव्दारे मिळालेल्या वर्णनानुसार एक मोटारसायकल भरधाव वेगाने येतांना दिसली म्हणून शंका आल्याने संबंधित मोटारसायकल स्वाराला थांबण्याचा इशारा केला असता सदरील मोटारसायकल स्वाराने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला थांबवली.
तेव्हा मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोटारसायकलचा क्रमांक एम. एच. १९ डी. एच. १००३ हिरो होंडा कंपनीची तीच असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी पंचा समोर विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव गौरव राजेंद्र पाटील वय वर्षे (२६) राहणार गोराडखेडा असे सांगितले खात्री झाल्यावर त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेच्या मागील बाजूस पॅन्ट मध्ये खोचलेले २५०००/०० रुपये किंमतीचे एक राखाडी रंगाचे त्यावर काळ्या रंगाचे हॅन्डग्रईप असलेले पिस्टल (अग्निशस्र) त्यास ट्रिगर असलेले मॅगझिन व मॅगझिनमध्ये पाच काडतूस व ४००००/०० किंमतीची एम. एच. १९ डी. एच. १००३ क्रमांकाची हीरो होंडा मोटारसायकल मिळुन आले तेव्हा त्याला सदर पिस्टल बाळगण्याचा परवाना आहे का असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
सदर गौरव राजेंद्र पाटील याच्याकडे विनापरवाना अनाधिकृतपणे पिस्टल, मॅगझिन, काडतूस आढळून आल्याने पोलिस उपनिरीक्षक मा. श्री. जितेंद्र वल्टे यांनी पंचांसमक्ष मुद्देमाल जागेवरच जप्त करुन तसा सविस्तर पंचनामा केला असून गुन्हा शोध पथकाचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी गौरव राजेंद्र पाटील वय वर्षे (२६) याचे विरुध्द
भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली असून मुद्देमालासह आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.