आता १५ मार्च पर्यंत हे निर्बंध कायम… जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी जिल्ह्यात रात्री ध्वनीक्षेपक वाजविण्या करिता मिळाली ही सूट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०३/२०२१
जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात रात्री १० ते पहाटे ०५ या वेळेत संचारबंदी वाढवून पून्हा १५ मार्चपर्यंत करण्यात आल्याचे आदेश आज दुपारी जारी केले आहेत. तर शाळा, कॉलेज, क्लासेसही बंद राहणार आहेत.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे की,सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. मात्र ऑनलाइन शिक्षणाची सुविधा देता येणार आहे. या कालावधीत जर परीक्षा असतील तर त्याही घेता येणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरिता संबंधित शाळा/महाविद्यालयात उपस्थित राहता येईल. अभ्यासिका (लायब्ररी व वाचनालये) यांना केवळ ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरू ठेवता येतील.
यावर बंदी कायम….
धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरूस, दिंडी,सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, पार्क, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे
सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम,क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलन, आठवडेबाजार बंद,निदर्शने, मोर्चे, रॅली, बाजार समित्यांकडे किरकोळ विक्रेत्यांना बंदी,सर्व धार्मिक स्थळे एकावेळेस केवळ दहा लोकांच्या मर्यादित उपस्थितीत संबंधित पूजा-अर्चा यांसारख्या विधीसाठी खुली राहतील.
विवाह सोहळ्यात फक्त ५० जणच…
विवाहसोहळ्यात , कौटुंबिक कार्यक्रम करतांना लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचा भंग होणार नाही, याची संबंधितांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी.संपूर्ण जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) घोषित करण्यात येत आहे.