पळवापळवीच्या खेळत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे भाव वधारले. एका सदस्यासाठी एकलाखापासून तर दहालाख रुपयांची बोली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०२/२०२१
महाराष्ट्रात सर्वदूर ग्रामपंचायतीच्या निवडणूका कुठे शांततेत तर कुठे भांडणतंटे होत पार पडल्या यावर्षी ग्रामपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अगोदर मतदान लगेचच निवडणूकांचा निकाल व नंतर आरक्षण असल्याने सगळ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून मडके फोडण्याच्या स्पर्धेत भाग घेतल्याचे जाणवत होते.
तसेच गावपातळीवरील राजकारणाच्या चढाओढीत जिल्हा व तालुक्यातील आमदार, खासदारांनी आपपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायतीचा कारभार यावा व भविष्यातील पंचायतसमिती, जिल्हापरिषद तसेच आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला मोर्चेबांधणी करण्यासाठी सोयीचे जावे म्हणून तन, मन, धनाने भाग घेतला होता.
आता येत्या १३ तारखेपासून सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने बऱ्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बऱ्याचशा गावात आरक्षण निघालेल्या जागेवर दोघेही पँनलकडे उमेदवार निवडून आलेले असल्याने आपपले बहुमत सिध्द करण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांची मनधरणी करुन आपल्या बाजूने ओढण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.
यात ज्यांच्याकडे बहुमत आहे असे पँनलचे मुख्य सुत्रधार आपपल्या सदस्यांना घेऊन सहलीला रवाना झाले आहेत. परंतु तरीही सदस्यांची पळवापळवी करण्यासाठी बरेचसे दलाल सक्रीय झाले असून एका सदस्याला आपल्याबाजूने मतदान करण्यासाठी आपपल्या ऐपतीप्रमाणे एकलाख रुपया पासून तर काही ठिकाणी पंधरालाख रुपयापर्यंत बोली लागल्याचे जनमानसातुन ऐकावयास मिळत आहे.
पाचोरा व जामनेर तालुक्यात शिवसेना व भाजपा या पक्षात मोठ्या प्रमाणात चढाओढ असल्याचे चित्र दिसत असून यात राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची भुमिका महत्वाची ठरणार असून शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडून आलेले सदस्य शेवटी काय भुमिका निभावतात यावर होणाऱ्या सरपंच व उपसरपंच निवडणूकीचे भविष्य अवलंबून आहे.
[आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवर खेळीमेळीच्या वातावरणात होत होत्या परंतु प्रथमच या निवडणुकीत जिल्हा व तालुकास्तरीय नेत्यांनी सहभाग घेतल्याने तसेच समाजकारणाच्या नावाखाली काहींनी पाण्यासारखा पैसा खर्चून मतदान घेऊन लोकशाहीला घातक अशी पध्दत सुरु केल्याने तर काही ठिकाणी काम, दाम, दंड, भेद वापरून मतदान आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी नको ते प्रयोग केल्याने शांतताप्रिय लोक राजकारणापासून चार हात लांबच राहिले हे लोकशाहीला घातक असल्याचे जाणकार लोक सांगतात]