गोवंश हत्या व मांस विक्री करणाऱ्या एका विरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावात एक इसम गोवंश हत्या बंदी असतांना सुद्धा आर्थिक फायद्यासाठी गोवंशाची हत्या करुन मांस विक्री करतांना आढळून आल्याने त्याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माहीत पडताच वरखेडी, भोकरी गावांसह संपूर्ण तालुक्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावाजवळील जामनेर ते पाचोरा रस्त्यालगत पी. डी. बडोला माध्यमिक विद्यालयाच्या समोरील अकबर युसुफ कुरेशी याच्या मालकीच्या गट नंबर २५/२७ या स्वताच्या शेतातील पत्र्याच्या शेडजवळ गोवंश हत्या बंदी असतांनाही स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी गोवंशाची (जनावरांची) हत्या करुन मांस विक्री करत असल्याची गुप्त माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे त्यांनी दिनांक १५ एप्रिल २०२४ सोमवार रोजी सायंकाळी सात वाजता घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी गोवंशाची कत्तल केलेले मांस, शिंगे, हाडे, खुरे व गोवंशाचे (जनावरांचे) अवशेष तसेच गोवंशाची हत्या (कत्तल) करण्याच्या इराद्याने कत्तलीसाठी जखडून ताब्यात ठेवलेली गुरे आढळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल दिपकसिंग जितेंद्रसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून वरखेडी येथील अकबर युसुफ कुरेशी वय (४६) वर्षे या भोकरी येथील गुरे व्यापाऱ्याच्या विरोधात गोवंश हत्या (सुधारणा) कायदा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५, ५ (क) चे उल्लंघन ९, ९ (अस) व प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ प्रेमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच गोवंशाची हत्या करुन मांस विक्रीच्या इराद्याने जखडून ठेवलेला गावरान जातीचा वाघ्या रंगाचा चार वर्षे वयाचा ४०००/०० रुपये किंमतीचा गोऱ्हा, एक गावरान जातीचा चार वर्षे वयाचा १००००/०० रुपये किंमतीचा बैल, एक गावरान जातीचा लाल रंगाचा बैल पाच वर्षं वयाचा किंमत १००००/००, एक गावरान जातीचा बैल १५०००/००, जर्सी जातीचा बैल ५०००/०० किंमतीचा, एक रेडा किंमत ५०००/००, एक जर्सी जातीचा गोऱ्हा किंमत ५०००/००, एक लाल रंगाचा गोऱ्हा किंमत ७०००/००, एक लाल रंगाचा गोऱ्हा किंमत ५०००/००, एक पांढऱ्या रंगाचा गावरान जातीचा गोऱ्हा किंमत ५०००/००, एक पांढऱ्या व काळ्या रंगाचा गावरान जातीचा गोऱ्हा किंमत ५०००/०० तसेच अंदाजे २० किलो वजनाचे खुरे, शिंगे व हाडे किंमत १०००/०० याप्रमाणे एकूण ८००००/०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या जनावरांच्या सापडलेल्या अवशेषांचे काही अवशेष तपासणीसाठी पशुधन विस्तार अधिकारी पाचोरा यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. सदरील जनावरे ही संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील कवली येथील मातापिता गोशाळा सामाजिक संस्था गोशाळेत रवाना करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याकामी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्रसिंग पाटील, विजय माळी, रणजित दादा पाटील, जितेंद्र पाटील यांनी काम पाहिले.
या कारवाईबाबत सुज्ञ नागरिकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचे कौतुक केले आहे. असे असले तरीही आजही भोकरी येथे चोरुन, लपून गोवंशाची कत्तल केली जात असून ही होणारी कत्तल कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी मागणी करण्यात येत आहे.