कोल्हे गावातून शौचालयांची चोरी, हागणदारी मुक्त गाव योजनेचा बोजवारा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०८/२०२१
(गावचे गाव जळे, हनुमान बेंबी चोळे.)
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करतांनाच नियमानुसार वैयक्तिक शौचालय असल्याचा पुरावा सादर करावा लागतो. परंतु शासनाच्या डोळ्यात धुळफेक करुन गावचे सरपंच हेच स्वता शौचालयाचा वापर करत नसून अद्यापही त्यांचे राहते घरी वैयक्तिक शौचालय नसल्याने हा एक कुतूहलाचा विषय ठरत आहे.
पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावासह संपूर्ण तालुक्यात घरकुल योजना व वैयक्तीक शौचालय योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून पाचोरा तालुक्यातील गावागावातून हजारो शौचालये व शेकडो घरकुलांची चोरी झाली असल्याची चर्चा गावागावात सुरु आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील गावागावात शासनाकडून हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी वैयक्तिक शौचालय तसेच विविध योजनांद्वारे घराघरात शौचालय बांधण्यात यावे म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च केले, परंतु येथील सरपंच, सदस्य व ग्रामसेवक तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने या शौचालयांचे वाटप करतांना वशिलेबाजी होऊन काही शौचालये फक्त कागदावरच दाखवून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत अनुदान लाटण्यात आले आहे.
तर काही शौचालये गावात न बांधतात शेतात, खळ्यात किंवा इतर नातेवाईकांना देण्यात आली असून राहिलेल्या इतर लाभार्थ्यांनी शौचालय बांधले आहेत परंतु ते त्याचा वापर शौचालयासाठी करत नसून त्या शौचालयाचा वापर गोवऱ्या, काड्या, सरपण किंवा इतर वस्तु भरून स्वच्छालय बंद केली आहेत.
या सर्व कारणास्तव शासनाचा गाव हागणदारीमुक्त करण्याचा हेतू फोल ठरत असून गावाजवळ व गाव व परिसरात गावातील ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात असल्यामुळे रस्त्याने व गाव परिसरात दुर्गंधी पसरली असून पावसाळ्याचे दिवस असल्याने आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी शासनाने घरकुल वाटपात तसेच शौचालय योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या किंवा निधीचा गैरवापर करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोल्हे ग्रामस्थांनी केली आहे.