भोकरी ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये कमालीचा भ्रष्टाचार, भोकरी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या संतप्त भावना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०१/२०२४
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून अंतर्गत रस्ते तयार केले जात आहेत. काही भागामध्ये सिमेंटचे कॉंक्रिटीकरण तर काही भागांमध्ये पेव्हर बॉक्स बसविण्यात येत आहेत. परंतु हे काम करत असत असतांना कॉंक्रिटीकरण करतांना चांगल्या प्रतीची रेती (वाळू) व सिमेंट वापरणे क्रमप्राप्त असतांनाही वाळू वापरतांना मातीयुक्त वाळू तसेच कमी दर्जाचे सिमेंट वापरून काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.
काँक्रिटीकरण करताना सिमेंटचे प्रमाण कमी असल्याने काँक्रिटीकरणाचा रस्ता काही दिवसातच नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पेव्हर बॉक्स बसवतांना चार इंचीचे पेव्हर बॉक्स बसवणे गरजेचे असतांना त्या ठिकाणी फक्त दीड ते दोन इंचाचा पेव्हर बॉक्स बसविण्यात येत असल्याने हे पेव्हर ब्लॉक लगेचच तुटतील असे मत व्यक्त करत भोकरी ग्रामस्थांनी या भ्रष्टाचार युक्त होत असलेल्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून ते लवकरच वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे भोकरी ग्रामस्थांनी सांगितले आहे.
या तक्रारीची दखल घेऊन सत्यजित न्यूज सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी लवकरच भोकरी गावात जाऊन ग्रामस्थाचे म्हणणे ऐकून सत्य परिस्थिती जाणून घेत तसेच सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून खुलासा घेऊन सत्यता शासन, प्रशासन व जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.