विद्युत बिलाच्या वसुलीसाठी थकबाकीदार विद्युत ग्राहकांचा विद्युत पुरवठा त्वरित खंडित करा, मुख्य अभियंता मा. श्री. कैलास हुमणे यांचे आदेश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०३/२०२३

सद्यस्थितीत एका बाजूला सगळीकडेच मोठ्या प्रमाणात विद्युत बिलाची थकबाकी वाढली आहे. तसेच थकित विद्युत बिलाच्या वसुलीसाठी जेव्हा अधिकारी व कर्मचारी जातात तेव्हा थकबाकीदार विद्युत ग्राहक वायदे करुन वेळ मारुन नेतात किंवा संबंधित वसुलीसाठी आलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या पथकाशी अरेरावीची भाषा करतात व यातुनच काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.

तर दुसरीकडे पाचोरा, भडगाव, पारोळा तालुक्यातील थकित विद्युत बिलांची रक्कम दिवसेनदिवस वाढतच चालली असल्याने विद्युत वितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली असल्याने वर्षाअखेर विद्युत बिला पोटी वाढलेली थकबाकी कश्या पद्धतीने वसुल करता येईल याकरिता जळगाव झोनचे मुख्य अभियंता मा. श्री. कैलास हुमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ०८ मार्च २०२३ बुधवार रोजी पाचोरा येथील आशिर्वाद हॉलमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पाचोरा विभागातील २९ पक्षप्रमुख व साधारण ३०० कर्मचारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत थकित विद्युत बिलांची वाढती रक्कम व ही थकित बिले वसुली होत नसल्याने विद्युत वितरण कंपनी आर्थिक परिस्थिती यावर सविस्तर चर्चा करुन विद्युत वितरण कंपनी ही बिकट परिस्थितीत आली असल्याचे सांगत घरगुती, व्यवसायिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे थकित वीज बिल वसुलीसाठी सवलत देऊनही विद्युत ग्राहकांकडून कोणतेही सहकार्य किंवा प्रतिसाद मिळत नसल्याने आता कोणत्याही परिस्थितीत विज बिल वसुलीसाठी संबंधित थकबाकीदाराचे विद्युत कनेक्शन त्वरित खंडित करुन विद्युत पुरवठा खंडित करावा. तसेच शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन कृषी पंपाचे वीजबिल भरण्यासाठी शासनाने वेळोवेळी सवलत देऊन तसेच विद्युत वितरण कंपनीकडून अनेक वेळा सवलती देऊनही पाच, पाच वर्षे उलटली तरी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अद्यापही वीजबिल भरणा केलेला नाही अश्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचाही विद्युत पुरवठा त्वरित खंडित करावा तसेच ज्या विद्युत ग्राहकांचा कायमस्वरूपी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे त्या ठिकाणी जाऊन स्थळ परिक्षण करुन सदर ठिकाणी विजेचा वापर सुरु असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर भा. द. वी. कलम १३५, १३८ प्रमणे पोलिस कारवाई करण्यात यावी असे आदेश देत शासकीय कार्यालयाकडे असलेली थकबाकी त्वरित वसुल करण्यात यावी अश्या सुचना दिल्या.

तसेच विद्युत बिलाची थकबाकी वसूल करतांना कोणत्याही दडपणाखाली न येता आपापल्या जबाबदारीने मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सक्तीने वसुली करावी. तसेच विद्युत बिलाच्या वसुलीसाठी संबंधित विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कामत कसूर किंवा दिरंगाई करत असल्याचे आढळून आल्यास कंपनीच्या नियमानुसार संबंधांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी मुख्य अभियंता मा. श्री. कैलास हुमणे यांनी सर्वांना दिली आहे.

पाचोरा येथील भडगाव रोडवरील आशिर्वाद हॉलमध्ये घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत जळगावचे अधीक्षक अभियंता मा. श्री. राजेंद्र मार्के साहेब, पाचोरा विभागाचे कार्यकारी अभियंता मा. श्री. रामचंद्र चव्हाण, तसेच पाचोरा विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता, सर्व कक्ष प्रमुख, बिलींगचे सर्व कर्मचारी, विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी, बाह्यश्रोत कर्मचारी उपस्थित होते.