पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य जनतेचा जीव टांगणीला, खासदार निधी पाण्यात जाण्याची दाट शक्यता..

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/११/२०२३

पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे पाचोरा ते वडगाव आंबे या अंदाजे १६ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरुन प्रवास करतांना वाहनधारकांसह एस. टी. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच याच रस्त्यावर वाढते अतिक्रमण, रस्त्यांची झालेली दुरावस्था तसेच योग्य ठिकाणी सुचना फलक लावण्यात आले नसल्याने वाहनधारकांसह पायी चालणाऱ्या सर्वसामान्य वाटसरूंच्या जीविताला धोका निर्माण झाला असुन दररोज लहान, मोठ्या अपघातांची मालिका सुरु असल्याचे दिसून येते.

याबाबत सविस्तर वृत्त असे पाचोरा ते जामनेर रस्त्यावर पाचोरा शहरापासून पुर्वेकडे वडगाव आंबे गावापर्यंतचा अंदाजे १६ किलोमीटर रस्ता हा पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकक्षेत येतो व याच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावर दररोज लहानमोठे अपघात होऊन वाहनधारकांच्या वाहनाचे नुकसान होत असुन या अपघातामुळे काही वाहनधारकांना किरकोळ दुखापत तर काही वाहनधारकांच्या हातात, पायाला अस्थिभंग (फ्रॅक्चर) होत असल्याने नहाकच निष्पाप वाटसरुंना दवाखान्याच्या खर्चासह अंपगत्वाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच पाचोरा ते वडगाव आंबे या १६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर असलेल्या गावागावातील बसस्थानक, शाळा, कॉलेज व गाव, वस्तीजवळ काही ग्रामस्थांनी व काही व्यवसायीकांनी रस्त्याच्या अगदी कडेला रहदारीला अडथळा निर्माण होईल अश्या ठिकाणी अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे अतिक्रमित ठिकाणी असलेल्या हॉटेल, पानटपरी, चहाची दुकाने तसेच बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात लोक जमलेले असतात यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने वाहनधारकांना आपले वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

*महत्वाचे*
महत्वाचे म्हणजे मागील आठवड्यात पाचोरा ते जामनेर रस्त्यावर वडगाव आंबे गावाजवळील पारिमांडल्य महानुभाव आश्रमापासून ते वडगाव आंबे गावाच्या बसस्थानकापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत डांबरीकरणापासून काही फुटांच्या अंतरावर पथदिवे बसवण्यासाठी विद्युत खांब उभारण्यात आले असल्याने याठिकाणी अतिक्रमणात अजून भर पडली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता हे पथदिव्यांसाठीचे उभारण्यात आलेले खांब खासदार मा. श्री. उन्मेष दादा पाटील यांच्या निधीतून २८ लाख रूपये खर्चून उभारण्यात आले आहेत. हे खांब त्वरित काढण्यासाठी गावकऱ्यांनी पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत हे पथदिव्यांसाठीचे खांब कोणी उभारले याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अद्यापही ठेकेदाचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे हे खांब कसे हटवावे हा गहन विषय निर्माण झाला आहे.

मात्र भविष्य या रस्त्याचे लवकरच रुंदीकरण करण्यात येणार असून रुंदीकरण करण्यासाठी नुकतेच मोजमाप करण्यात आले आहे. ज्यावेळी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल त्यावेळी हे पथदिव्यांसाठी उभारण्यात आलेले दिव्यांचे खांब काढून टाकले जाणार असल्याने हा खासदार निधी पाण्यात जाण्यार असल्याचे दिसून येत असल्याने सुज्ञ नागरिकांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदाराबद्दल संशय व्यक्त केला असून संबंधित ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अप्रत्यक्षपणे सहकार्य करत असल्याचा आरोप केला आहे.

तसेच पाचोरा ते वडगाव आंबे रस्त्यावर येणाऱ्या सर्वच गावातील बसस्थानक, शाळा कॉलेज व गाव वस्तीजवळ विविध ठिकाणी वेगवेगळ्या व्यवसायीकांनी भररस्त्यावर आपली दुकाने थाटली असल्याने याठिकाणी ग्राहकांची सतत वर्दळ असते यामुळे बऱ्याचशा वेळा लहानमोठे अपघात होऊन दररोज भांडणतंटे व यातुनच मारामाऱ्या होऊन ही भांडणे जीवघेणी ठरत आहेत. कारण या अतिक्रमण धारकांना कुणाचाही धाक राहिलेला नसल्याचे अतिक्रमण धारकांच्या बोलण्यावरून जाणवते आहे.

“अंधा बोले क्या होता, बहिरा बोले ब्याह होता”

पाचोरा ते वडगाव आंबे या १६ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नको त्या ठिकाणी गरज नसतांना जागोजागी गतीरोधक बनवण्यात आले आहेत. गतीरोधक बसवणे ही बाब चांगली आहे. मात्र गतीरोधक बनवल्यानंतर गतीरोधकापासून ठराविक अंतरावर पुढे गतीरोधक आहेत असे सुचना फलक लावण्यात आलेले नाही तसेच गतीरोधकाजवळ पांढरे पट्टे (झेब्रा क्रॉसिंग) टाकण्यात आले नसल्याने किंवा लाल रिफ्लेक्टर बसवले नसल्याने या रस्त्यावरुन जाणाऱ्या, येणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यावर गतीरोधक असल्याचे ज्ञात होत नाही व वाहन चालवतांना अचानकपणे गतीरोधक दिसल्यावर वाहनांचा वेग आटोक्यात आणण्यासाठी अर्जंट ब्रेक लावला असता दुचाकी वाहन घराण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच चारचाकी किंवा मोठ्या वाहनांची या गतिरोकावर आदळल्याने मोडतोड होऊन एखाद्यावेळी वाहन पलटी होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अश्या या सगळ्या समस्यांकडे सार्वजनिक बांधकाम पाचोरा विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुंभकर्ण झोपेत असल्याने या सर्व समस्या कोण सोडणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या